येथील दत्त चौकाजवळ बुधकर चाळीनजीक एका युवकावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
कराड : येथील दत्त चौकाजवळ बुधकर चाळीनजीक एका युवकावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली होती. यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान बुधवारी पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
बैजुनाथ अशोक जिरगे (वय २९) रा. दत्त चौक, कराड आणि अजय उर्फ पिल्या अभयकुमार काळे (२५) रा. शुक्रवार पेठ, कराड अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर सुशांत उर्फ बबलू मुरलीधर काटकर रा. भोई गल्ली, रविवार पेठ, कराड असे चाकु हल्ल्यात मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील रविवार पेठेतील बबलू काटकर याच्याशी बैजुनाथ जिरगे व अजय काळे या दोघांचा किरकोळ वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून त्यांनी २५ डिसेंबर रोजी बबलूवर हल्ला केला. २५ डिंसेबरला दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बबलू दत्त चौकातील बुधकर चाळ येथे थांबला होता. त्यावेळी बैजुनाथ व अजय त्याठिकाणी आले. त्यांनी बबलूशी जुन्या भांडणावरुन वाद घातला. वाद सुरू असतानाच अजयने बबलूचे हात धरले. त्याचा फायदा घेत बैजुनाथ याने सोबत आणलेल्या चाकुने बबलूला भोकसले. त्यामध्ये जखमी झालेला बबलू खाली कोसळताच दोघांनी तेथून पळ काढला.
त्यांनतर परिसरातील नागरीकांनी जखमी बबलूला रूग्णालयात हलवले. गत चार दिवसांपासून बबलूवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी २९ रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बैजुनाथ जिरगे व अजय काळे यांना अटक केली आहे. बबलूच्या मृत्यमुळे पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


