maharashtra

पुरुषोत्तम जाधव यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा


Purushottam Jadhav supports Chief Minister Eknath Shinde group
उद्योजक आणि शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केला. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला सुरुंग लागल्याचे मानण्यात येते.

सातारा : उद्योजक आणि शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाहीर पाठिंबा दर्शवत शिंदे गटात प्रवेश केला. या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील शिवसेनेला सुरुंग लागल्याचे मानण्यात येते.
याबाबत शिवसेना नेते पुरुषोत्तम जाधव आणि ठाण्याचे माजी नगरसेवक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शरदराव कणसे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका विशद केली.
शरद राव कणसे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्ह्यात आमचे एक पथक दाखल झाले असून गेल्या काही दिवसांपासून आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहोत. या चर्चेतून शिवसेनेची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, ही बाब अधोरेखित झाली. विशेष म्हणजे गेले दोन दिवस आम्ही प्रत्यक्ष लोकांच्या गाठीभेटी घेत असताना गावागावातील सरपंच आणि सदस्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय घेतला असून अनेक ग्रामपंचायतींनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबांची पत्रे दिलेली आहेत. ७५० जणांनी शिंदे गटाच्या शिवसेनेचे फॉर्म भरले आहेत. माण- खटाव, पाटण, कराड या तालुक्यामध्ये दौरे करत असताना याही ठिकाणी पक्षविरहित अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. भविष्यात आम्ही पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा आहोत, असेही शरदराव कणसे यांनी सांगितले.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, शिवसेना ही संघटना वाढवण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट घेतले त्या शिवसेनेने सातारा जिल्ह्याला काय दिले? विकासाचे प्रश्न मार्गी लागत नाही, निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. दोनच दिवसांपूर्वी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून त्यांना सातारा जिल्ह्यात अधिक मंत्री पद द्या,  अशी मागणी केली आहे. सातारा जिल्ह्यात आजही शेतकऱ्यांची फरफट होत आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी यापुढे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.