मी माझ्या पगारावर समाधानी
सतीश बुद्धे यांच्या त्या पाटीची जोरदार चर्चा; सातारा पंचायत समितीत प्रामाणिक लोकसेवक आल्याने समाधान
सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी आपल्या दालनाबाहेर 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे' अशा आशयाची पाटी लावल्याने पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सातारा : सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी आपल्या दालनाबाहेर 'मी माझ्या पगारावर समाधानी आहे' अशा आशयाची पाटी लावल्याने पंचायत समितीत कामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोणतेही शासकीय काम थेट व्हावे सुलभ व्हावे आणि विनामूल्य व्हावे हीच या पाठीमागची अपेक्षा आहे, असे स्पष्ट धोरण बुध्दे यांनी स्वीकारले आहे. मी काही कारणास्तव बाहेरगावी असल्यास या क्रमांकावर नावासह संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी या पाटीद्वारे केले आहे.
कोणत्याही शासकीय कार्यालयात काम वेळेवर होत नाहीत म्हणून सर्वसामान्यांना हजार वेळा खेटे मारावे लागतात. त्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी राज्य शासनाला सेवा हमी कायदा अमलात आणावा लागला. सातारा पंचायत समितीमध्ये नव्याने हजर झालेले गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी सर्वसामान्यांच्या कामाची गांभीर्याने दखल घेतली आहे. येथील कोणतेही काम सुलभ आणि विनाशुल्क व्हावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
त्यांनी आपल्या दाराबाहेर मी माझ्या पगारावर समाधानी आहे अशा आशयाची पाटी लावली आहे. या पाटीची सातारा प्रशासनाच्या वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पंचायत समितीमध्ये वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठी आणि चौकशीसाठी सर्वसामान्य शेतकरी तसेच सामान्य नागरिक येत असतात. त्यांना थेट मार्गदर्शन व्हावे तसेच येथील काम हे शासकीय चौकटीत विहित वेळेमध्ये पूर्ण केले जाते, याचा स्पष्ट संदेश जावा याकरता या पाटीचे प्रयोजन केल्याचे सतीश बुध्दे यांनी सांगितले.
बुद्धे हे २०१५ चे प्रशासकीय स्पर्धा परीक्षेतून शासकीय सेवेत हजर झाले. बुध्दे हे मूळचे लातूर येथील असून ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मांजरी तसेच जावली तालुका येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी चार वर्ष सेवा बजावली होती. काही दिवसापूर्वीच त्यांची सातारा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी म्हणून बदली झाली आहे. बुद्धे यांच्या अनोख्या कार्यशैलीचे सातारा पंचायत समितीत कौतुक होत आहे.


