maharashtra

सा.बां. विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा शासकीय कार्यालयात धुडगूस

शासकीय कार्यालयात केला ठेकेदाराचा वाढदिवस साजरा; आम आदमी पक्षाची कारवाईची मागणी

कार्यालयातच एका खासगी ठेकदाराचा वाढदिवस साजरा करुन त्यांनी नियमबाह्य काम केले असून या अधिकारी कर्मचार्‍यांवर शिस्तभंग आणि शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी निवेदनाद्वारे सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांच्याकडे केली आहे.

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांचे आणखी एक कृष्णकृत्य समोर आले आहे. कार्यालयातच एका खासगी ठेकदाराचा वाढदिवस साजरा करुन त्यांनी नियमबाह्य काम केले असून या अधिकारी कर्मचार्‍यांवर शिस्तभंग आणि शासकीय कामात अडथळा प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी निवेदनाद्वारे सा.बां. विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर दराडे यांच्याकडे केली आहे.
सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने विविध विभागांची आखणी करीत सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य दिले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी मात्र मस्तवालपणे सर्वसामान्यांची कामे सोडून धनदांडग्या ठेकेदारांचे लांगुलचालन करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
दि. 2 डिसेंबर रोजी खासगी ठेकेदार मुचंडी यांचा वाढदिवस होता. खरेतर एखाद्या अधिकार्‍याचा जरी मुचंडी मित्र, यार, सखा असला तरी त्याचा वाढदिवस कार्यालयाबाहेर साजरा करणे नियमानुसार होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग जसे काही आपल्या पिताश्रींचा असल्याप्रमाणे शासकीय जागेची तमा न बाळगता येथील अधिकारी-कर्मचार्‍यांनी मुचंडी यांचा वाढदिवस शासकीय कार्यालयात केक आणून तो टेबलवर कापण्यात आला. यावेळी विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांसह टेंडर क्लार्क लावंड यांचीही उपस्थिती होती.
याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील दोषींवर निलंबनाची कावाई करुन त्यांच्यावर शिस्तभंग आणि शासकीय कामात अडथळा आणणे हे गुन्हे दाखल होणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान 10 डिसेंबर 2022 पर्यंत दोषींवर कारवाई न झाल्यास आम आदमी पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्याचा इशारा सरदार (सागर) भोगांवकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. यासोबतच यातून निर्माण होणार्‍या कायदा व सुव्यवस्थेच्या कोणत्याही घटनेस सा.बां. विभाग आणि विभागाचे कार्यकारी अभियंता जबाबदार असतील, असेही म्हटले आहे.
निवेदनाच्या प्रती सातारा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, अधीक्षक अभियंता सातारा यांना पाठविण्यात आल्या आहेत.