टोळी प्रमुख सुरज बोडरे याने त्याच्या टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे.
फलटण : फलटण ग्रामीण पोलीस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील आरोपी टोळी प्रमुख सुरज बोडरे व त्यांच्या १२ साथीदारांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबर दुखापत घडवुन आणण्याच्या प्रयत्नासह दरोडा, जबरी चोरी, अपनयन, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवुन मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, अपहरण, आर्म अॅक्ट अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असुन टोळी प्रमुख सुरज बोडरे याने त्याच्या टोळीची दहशत पसरविण्यासाठी फलटण तालुक्यातील इतर गुन्हेगारी टोळीतील सदस्यांना एकत्र करुन दहशत पसरविल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी या टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित करुन आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास कोल्हापूर परिक्षेत्राचेविशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मंजुरी दिली असून गुन्ह्यात मोक्का कायद्याची कलमे लावुन या गुन्ह्याचा तपास फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नोव्हेंबर २०२२ पासुन एकुण ४ मोक्का प्रस्तावामध्ये ४४ इसमांविरुध्द मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई केली आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांच्या विरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येणार आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, पो. उ. नि. सागर अरगडे, पो.उ.नि. गणेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अमित सपकाळ, फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार संजय राऊत, वैभव सूर्यवंशी, अमोल जगदाळे अभिजित काशिद, अजय कडेकोट, स्वप्निल खराडे यांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला आहे.


