सातारा शहरालगतचे उपनगर असलेल्या खेड मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी येत नसल्याने हजारो लोकांची गैरसोय झाली असून त्यांना ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
सातारा : सातारा शहरालगतचे उपनगर असलेल्या खेड मध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पाणी येत नसल्याने हजारो लोकांची गैरसोय झाली असून त्यांना ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच खेड ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाले. विकासाची स्वप्ने दाखवणार्या सत्ताधार्यांनी हळद उतरते न उतरते तोच आपला रंग दाखवायला सुरुवात केल्याने ज्यांना मोठ्या आशेने निवडून दिले, त्यांनीच पाण्यासाठी वणवण फिरायला लावल्याने ग्रामस्थांमध्ये प्रक्षुब्धतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या विकासनगर, प्रतापसिंहनगर, काळेश्वरी कॉंलनी, गजानन पार्क, सुविधा अपार्टमेंट, यादव कॉंलनी यासह सुमारे दोन ते तीन हजार लोकवस्ती असलेल्या भागाचा गेल्या चार ते पाच दिवसापासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तिव्र झळा अंगावर घेऊन पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विकासनगर, प्रतापसिंहनगर, काळेश्वरी कॉंलनी, यादव कॉंलनी, गजानन पार्क, गोकर्ण नगर, या सह अन्य सुमारे दोन ते तीन हजार लोकसंख्या असलेल्या वसाहतीला ग्रामपंचायतीच्या विकासनगर येथील भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. या योजनेच्या फिल्टर टँक मधील विद्युत मोटर चार दिवसापुर्वी बंद पडली. विद्युत मोटरची दुरुस्ती करण्यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना न केल्याने तसेच या संबंधी पर्यायी व्यवस्था न केल्याने नागरिकांना पाणी टंचाई ला सामोरे जावे लागले असल्याचे नागरिकांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.


