maharashtra

सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

वाई, भुईंज, खंडाळा व महामार्ग परिसरात जोरदार पावसाच्या सरी

सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाई, खंडाळा, भुईंज तसेच सातारा तालुक्यातील लिंब, नागठाणे, खिंडवाडी येथे महामार्ग परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र चांगलीच पळापळ झाली.

सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारी वाई, खंडाळा, भुईंज तसेच सातारा तालुक्यातील लिंब, नागठाणे, खिंडवाडी येथे महामार्ग परिसरात सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र चांगलीच पळापळ झाली.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता पुढील 48 तासात वर्तवण्यात आली होती. त्याचा प्रत्यक्ष अनुभव बुधवारी साताऱ्याने घेतला. दुपारी तीन वाजल्यानंतर जोरदार वाऱ्यासह सारेच वातावरण आभाळून आले होते. 4:15 च्या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सुरू झाला. वाई, खंडाळा, भुईंज ते सातारा तालुक्यातील खिंडवाडी, नागठाणे, लिंब या परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊण तास हा जोरदार पाऊस सुरू होता. हवामान विभागाने गारांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे, तर 17 मार्च रोजी कदाचित अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वादळी पावसामुळे शेती पिके आणि फळपिकांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. साताऱ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील ट्रान्सफॉर्मर मधील बिघाडामुळे वीज सुमारे एक तास खंडित झाली होती. त्यामुळे नागरिकांची चांगलीच अडचण झाली. वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस जोरदार पावसाच्या शक्यतेचे भाकित वर्तवण्यात आले आहे. मेघगर्जना व वादळीवाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरीची शक्यता सांगण्यात आली आहे. भाजीपाला, फळे व रब्बी पिकांची काढणी करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवावी, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी कळवले आहे. नागरिकांनी दामिनी हे ॲप डाऊनलोड करून जनावरांचे व स्वतःचे रक्षण करावे. या ॲपमुळे शेतकरी व इतर नागरिकांना वादळी पाऊस विजांच्या कडकडाटाचा पंधरा मिनिटे, अर्धा तासासाठी अचूक अंदाज मिळतो.