maharashtra

महाराष्ट्र अंधत्व मुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

राजेश टोपे : नेत्रोपचार दवाखान्यांना 'डे केअर सेंटर' म्हणून नोंदणीची मान्यता देण्यासाठी प्रयत्न करणार

Maharashtra needs concerted efforts to eradicate blindness
नेत्रोपचार करणाऱ्या दवाखान्यांना 'डे केअर सेंटर' म्हणून नोंदणीची मान्यता मिळण्यासाठी सध्याच्या कायद्यात सरकार बदल करेल, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.

पुणे : नेत्रोपचार करणाऱ्या दवाखान्यांना 'डे केअर सेंटर' म्हणून नोंदणीची मान्यता मिळण्यासाठी सध्याच्या कायद्यात सरकार बदल करेल, असे आश्वासन राजेश टोपे यांनी दिले.
पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या 'पी.ओ.एस.स्पेक्ट्रम २०२१' या  वार्षिक परिषदेचे उद्घाटन शनिवार दि. ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता परिषदेचे उद्घाटन रॉयल कॅनॉट बोट क्लब पुणे येथे झाले. उद्घाटनाच्या सत्रात महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे  यांनी  परिषदेला ऑनलाइन संबोधित केले. उद्घाटन समारंभासाठी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ब्रिगेडियर डॉ. एन. एस मणी उपस्थित होते.
डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. संजय टेकावडे यांच्या भाषणातील संदर्भ घेवून आरोग्य मंत्र्यांनी नेत्रचिकित्सा करणारे दवाखाने हे 'डे केअर सेंटर' म्हणून नोंदणी होण्यासंदर्भात कायद्यात बदल करण्याचे आश्वासन दिले.
परिषदेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. संजय टेकावडे, सचिव डॉ. ऋजुता माचवे, खजिनदार डॉ. सीमा खैरे, प्रमुख विश्वस्त डॉ. प्रकाश मराठे यांनी स्वागत केले. परीषदेचे हे १४ वे वर्ष आहे. परिषदेच्या स्मरणिकेचे आणि डिरेक्टरीचे प्रकाशन उद्घाटन सत्रात झाले. नेत्रसेवा क्षेत्रातील मान्यवरांचा विविध पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. नेत्रोपचार, नेत्रविकार, चिकित्साविषयक नवीन तंत्रज्ञान सद्यस्थिती याविषयी परिषदेत चर्चा झाली. संशोधनपर निबंध सादर केले गेले.
राजेश टोपे म्हणाले, डोळे हे ज्ञानेंद्रिय असल्याने नेत्रदानाचा प्रसार व्हायला हवा. मरणोत्तर नेत्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारी परवानगीची प्रक्रिया सोपी केली जात आहे. अंधत्व  कमी करण्यात यश मिळत आहे, आगामी वर्षात ते आणखी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अंधत्व मुक्त महाराष्ट्र उद्दिष्टासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. तपासणीसह, प्रतिबंधात्मक उपायांवर आपण भर द्यायला हवा. मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. मोबाईल सारख्या उपकरणाच्या वाढत्या वापराने दृष्टीवर परिणाम होत आहे. अशावेळी लहान मुलांना मोफत चष्मे मिळावेत यासाठी सरकार प्रयंत्न करित आहे. या परिषदेने चांगल्या सूचना सरकारला कराव्यात, त्याची नोंद घेतली जाईल.  
डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, कोविड साथीचा धोका कमी झाला तरी मास्क वापरण्याची सवय जाता कामा नये. कोविडमुळे डोळ्यांच्या समस्या देखील निर्माण झाल्या. अशावेळी नेत्र तज्ञ आणि पूना ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटीच्या नेत्रोपचाराचे योगदान महत्वपूर्ण आहे. नेत्रपटल दानाचे प्रमाण वाढायला हवे. नवे तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. रुग्णांना ते समजून सांगून मगच शस्त्रक्रिया केल्या पाहिजेत.  
डॉ. एन. एस. मणी म्हणाले, कोविड साथीच्या निर्बंधाच्या वेळेस नेत्रोपचार थांबले होते. आता नेत्र तज्ञांचे कार्य सुरु झाले आहे. रुग्णांवर उपचार सुरु झाले आहेत. मात्र, आता नवे तंत्रज्ञान आत्मसात करून रुग्णांना बरे केले पाहिजे. अशा परिषदातून नवे तंत्रज्ञान मांडले गेले पाहिजे.  
नेत्र तज्ञांचा गौरव
या परिषदेमध्ये डॉ. विश्वास डाके यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. शुभदा नारायण कुलकर्णी गुणवत्ता सन्मान डॉ. मदन फडणीस यांना देण्यात आला. डॉ. मधुसूदन झंवर पुरस्कार डॉ. सीमा खैरे यांना देण्यात आला. कै. आशा केळकर पुरस्कार डॉ. किशोर पाहुजा यांना देण्यात आला. साहेबराव सत्यवती मदान स्मृती पुरस्कार डॉ. जीवन लाडी यांना तर डॉ. विजय जठार पारितोषिक डॉ. क्षितीज तांबोळी यांना देण्यात आले. निखील मसुरकर यांचाही सत्कार करण्यात आला.परिषदेला एकूण ४०० नेत्र तज्ञ उपस्थित होते.