maharashtra

‘ब्राईटलँड’मधील मुख्यमंत्र्यांचा मुक्काम वादग्रस्त

महाबळेश्‍वर दौर्‍यात बगलबच्च्यांची चलबिचल, विकासकामांना मात्र पद्धतशीर बगल

सातारा जिल्ह्याचे सुपूत्र तथा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दोन दिवसांत जिल्ह्याचा दौरा असला तरी ते महाबळेश्‍वर-जावली तालुक्यातच घुटमळले. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंचा हा दुसरा जिल्हा दौरा होता.

सातारा : सातारा जिल्ह्याचे सुपूत्र तथा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. या दोन दिवसांत जिल्ह्याचा दौरा असला तरी ते महाबळेश्‍वर-जावली तालुक्यातच घुटमळले. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंचा हा दुसरा जिल्हा दौरा होता. या दौर्‍यांमधून सातारा जिल्ह्याच्या पदरात विकासकामांचा जोगवा मिळेल, अशी आशा असताना जोगवा सोडाच, पण धत्तुराही मिळाला नाही. काल-परवाच्या दोन दिवसीय दौर्‍यात शिंदेंचा मुक्काम महाबळेश्‍वरातील अलिशान अशा ‘ब्राईटलँड’ हॉटेलमध्ये होता. मात्र, हे हॉटेल बेकायदेशीर असल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जगविख्यात रोमन साम्राज्याचा सम्राट ज्युलियस सीझरच्या पाठीत खंजीर खुपसून मार्कस् ब्युटस इतिहासात अमर झाला. शेक्सपीअरने सुमारे सहाशे वर्षांपूर्वी राजकारणात खंजीर प्रसिद्ध केला. सुमारे दोन महिन्यांपूर्वीसुद्धा महाराष्ट्रातील राजकारणात कुणी, कोणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसला. या खंजीर नाट्यामध्ये ध्यानीमनी नसताना जिल्ह्याचे सुपूत्र असणारे एकनाथराव शिंदे महाराष्ट्राच्या विसाव्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. शिंदेंच्या रुपाने राज्याला सातारा जिल्ह्यातून पाचवा मुख्यमंत्री मिळाला. राज्याला जिल्ह्यातील पाच मुख्यमंत्री मिळूनसुद्धा सातारा जिल्ह्याचा विकास म्हणावा इतका झाला नाही. नूतन मुख्यमंत्र्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील असले तरी त्यांची कर्मभूमी ही ठाणेच राहिलेली आहे. अशात त्यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागल्यानंतर निश्‍चितपणे जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जिल्हावासीयांच्या आशा-अपेक्षांना धुमारे फुटले आहेत.
गेले दोन दिवस मुख्यमंत्री जिल्हा दौर्‍यावर आहेत. गेल्या दीड महिन्यात महाराष्ट्रात मोठे राजकीय रणकंदन पहावयास मिळाले. ना भूतो, न भविष्यती, अशा राजकीय सारीपाटावर घडामोडी घडल्या. धामधुमीच्या काळामध्ये नूतन मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनाही म्हणावा असा आराम मिळाला नाही. या दगदगीतून आराम मिळावा म्हणून मुख्यमंत्री 26, 27 ऑगस्ट रोजी महाबळेश्‍वर-जावली मुक्कामी होते. मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यात कोणतीही कसर राहू नये, यासाठी स्वत: नूतन जिल्हाधिकार्‍यांनी कंबर कसली. दौरा सुकर व्हावा म्हणून जिल्हा प्रशासन डोळ्यात तेल घालून कामावर जुंपले गेले. पण व्हायचे तेच झाले... अर्थातुराणां न सुखं न निद्रा, कामातुराणां न भयं न लज्जा । याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने उतावळेपणा केला. महाबळेश्‍वरात मुख्यमंत्र्यांच्या निवासाची सोय करताना ‘राजभवन’ या अलिशान शासकीय निवासस्थानाऐवजी ‘ब्राईटलँड’ या तारांकित हॉटेलात केली आणि नेमके याचठिकाणी जिल्हा प्रशासनाला घोडे लागले... कारणही तसेच आहे, महाबळेश्‍वर तालुक्यातील नाकिंदा या गावामध्ये हॉटेल ‘ब्राईटलँड’ रिझॉर्ट हे अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र, या हॉटेलच्या पिछाडीस क्षेत्र महाबळेश्‍वर इनाम वर्ग 3 च्या जमिनीवर याच हॉटेलचे बेकायदेशीर बांधकाम सुरु आहे. या बांधकामासंदर्भात 2019 पासूनच तहसिलदार, प्रांत तसेच जिल्हाधिकार्‍यांपर्यंत तक्रारी करण्यात आल्या आहेत. तक्रारी असूनही प्रशासनाने याकडे कानाडोळा करुन हे बांधकाम सुरुच रहावे, यासाठी विशेष प्रयत्न केले. गेल्या दीड वर्षामध्ये लॉकडाऊन होते. या लॉकडाऊनमध्येही या हॉटेलचे काम सुरु होते. मागील दोन वर्षापूर्वी शासनस्तरावर पुराव्यानिशी पत्रव्यवहार करुन व पाठपुरावा करुनही तत्कालीन जिल्हाधिकारी आणि प्रांतांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळेच हे टोलेजंग अनाधिकृत बांधकाम सद्यस्थितीत पुर्णत्वास आलेले आहे.
एखाद्याला सहाय्य केल्यानंतर फुल न फुलाची पाकळी देण्याची प्रथा आहे. शेकडो चौ. मीटर अनाधिकृत बांधकाम करणार्‍या ‘ब्राईटलँड’ हॉटेल व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरुन दोन दिवसांसाठी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राहण्यासाठी काही रुम देणे अवघड नाही. आता या हॉटेलच्या रुमचे भाडे नक्की जिल्हा प्रशासनाने अदा केले, की मुख्यमंत्र्यांनी? हा जरी संशोधनाचा विषय असला तरी गेल्या काही वर्षातील हॉटेल ‘ब्राईटलँड’च्या अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भात जिल्ह्यातील माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. तसेच या हॉटेलचे बांधकामही अनाधिकृत आहे, हे माहित असूनसुद्धा स्थानिक महसुली अधिकार्‍यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना का पाठविला नाही? की माहित असूनही आपलं कोण वाकडं करतंय, या कैफात असणार्‍या अधिकार्‍यांनी आज चक्क मुख्यमंत्र्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले आहे. गेल्या दीड महिन्यात आरोप-प्रत्यारोपांनी घायाळ झालेले एकनाथ शिंदे हवापालटासाठी महाबळेश्‍वरात येतात काय, आणि त्यांना पुन्हा जिल्हा प्रशासनच बेकायदेशीर हॉटेलात थांबवून त्यांची उरलीसुरलीही काढतात? मुख्यमंत्र्यांच्या दोन दिवसीय दौर्‍याची चर्चा चांगलीच रंगली. बेकायदेशीर हॉटेलात थांबून मुख्यमंत्र्यांनी महाबळेश्‍वरातील विकासकामांना 214 कोटींच्या निधीची मंजुरी देवून आत्मक्लेश केलेला आहे. आता या 214 कोटींचा विकासनिधी महाबळेश्‍वरात कधी येतोय, प्रत्यक्षात विकासकामांना कधी मुहूर्त मिळतोय, याकडेही महाबळेश्‍वरकरांचे लक्ष लागले आहे.