maharashtra

मांढरदेवीच्या दानपेटीतील पैसे लांबविणाऱ्या बँक कर्मचाऱ्याला अटक


मांढरदेवी येथील काळूबाई देवीच्या चरणी भाविक मोठय़ा प्रमाणात देणगी देत असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी मोजणी केली जाते. मंदिराच्या दानपेटीतील पैसे व दागिन्यांची ट्रस्टी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होती.

सातारा : मांढरदेवी येथील काळूबाई देवीच्या चरणी भाविक मोठय़ा प्रमाणात देणगी देत असतात. दर महिन्याच्या ठराविक दिवशी मोजणी केली जाते. मंदिराच्या दानपेटीतील पैसे व दागिन्यांची ट्रस्टी आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी सुरू होती. यावेळी बँकेचा एक कर्मचारी वारंवार मंदिराच्या आत-बाहेर करीत असल्याने हा कर्मचारी पैसे चोरी करीत असल्याचा संशय ट्रस्टींना आला. यानंतर त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे दानपेटीतील काही रोकड व दागिने आढळून आले. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मांढरदेवी येथील काळूबाईच्या मंदिरात असणाऱया दानपेटीतील दान करण्यात आलेल्या रकमेची व दागदागिन्यांची मोजदाद दर महिन्याला बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते. ट्रस्टींच्या समोर बँकेचे तीन कर्मचारी पैसे मोजण्याचे काम करतात. दुपारी नेहमीप्रमाणे पैसे मोजण्याचे काम सुरू असताना कदम नावाचा कर्मचारी दोन ते तीनवेळा आत बाहेर करीत असल्याचे ट्रस्टींच्या लक्षात आले. यावेळी या कर्मचाऱयाने चोरी केल्याचा संशय आल्याने ट्रस्टींनी त्याच्याकडे चौकशी करून व वाहनाची झाडाझडती केली असता त्याच्या गाडीत दीड लाखांची रोकड व सोन्याचे दागिने आढळून आले. यानंतर संबंधित कर्मचाऱयाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कर्मचाऱयाने चोरलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित कर्मचाऱयाने यापूर्वीही दानपेटीतील रक्कम व दागिने चोरले आहेत का? चोरले असतील तर ते किती? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.