maharashtra

कुख्यात गुंड गजा मारणेसह त्याच्या टोळीतील १४ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

साताराच्या तिघांचा समावेश; गज्या मारणे व इतर आरोपी फरार

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रूपयांच्या बदल्यात २० कोटींची मागणी करून व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १४ जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.

सातारा : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या ४ कोटी रूपयांच्या बदल्यात २० कोटींची मागणी करून व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह १४ जणांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तिघेजण सातारा येथील आहेत. नितीन पगारे (सातारा), प्रसाद उर्फ अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर, कोडोली, जि.सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
गज्या मारणे याच्यावर ताळोजा तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे महामार्गावर रॅली काढली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर त्याला एक वर्ष स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून सुटल्यानंतर गेले काही दिवस शांत होता. आता पुन्हा त्याच्यावर सुपारी घेऊन मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी), हेमंत ऊर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलुस), अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा), फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. कोडोवली, जि.सातारा), गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख), रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी), अजय गोळे (रा.नर्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, सहकारनगर), नवघणे अशी मोक्का कारवाई केलेल्यांची नावे आहेत. यात चौघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर गज्या मारणे व इतर आरोपी फरार झाले आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या तपासात या टोळीने परिसरात आपले वर्चस्व निर्माण व्हावे व इतर अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा याकरीता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तसा प्रस्ताव पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांना पाठविण्यात आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
या कारवाईनंतर साताऱ्यात एकच खळबळ माजली आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याच्या गॅंगमध्ये सातारचे तिघे सापडल्याने साताऱ्यातही त्याची पाळेमुळे मजबूत रोवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सातारा पोलिसांपुढेही आता मारणे याच्या संपर्कात आणखी कोण कोण आहेत, हे शोधण्याचे आवाहन आहे.