सातारच्या उपनगराध्यक्ष पदासाठी 5 नोव्हेंबरला निवड
व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे विशेष सभा ः मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर
सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीत मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर आहे.
सातारा : सातारा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा बोलावण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी सकाळी 10 वाजल्यापासून नामनिर्देशपत्र स्वीकारले जाणार आहे. उपनगराध्यक्ष निवडीत मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर आहे. गुरुवारी होणार्या निवडीकडे सार्यांचे लक्ष लागले आहे.
उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीचीही उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. नगरसेवक किशोर शिंदे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपनगराध्यक्षपद रिक्त झाले होते. सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा विकास आघाडीने राजकीय डावपेच आखत शहरातील त्या त्या भागात ताकद वाढवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना संधी दिली. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली साविआची बैठक झाली होती. त्यावेळी उपनगराध्यक्षपदी कुणाला संधी द्यायची, यावर चर्चा झाली होती. किशोर शिंदे यांनी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे आठ दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यामुळे साविआमध्ये इच्छुकांची संख्या वाढली. उपनगराध्यक्ष निवडीत सध्या मनोज शेंडे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पीठासीन अधिकारी तथापि, नगराध्यक्षा सौ. कदम यांनी उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि. 5 रोजी दुपारी 12.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट हे नामनिर्देशपत्र स्वीकारणार आहेत. पीठासीन अधिकारी नामनिर्देशपत्राची छाननी करणार आहेत. या निवडणुकीत एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास मत देण्यास इच्छुक असलेला प्रत्येक सदस्य सिसको बेबबॅक्स प्रणालीद्वारे मत देईल व त्याची कार्यवृत्तात नोंद घेवून उपनगराध्यक्ष निवडीचे कामकाज पूर्ण केले जाणार आहे. थेट निवडून आलेले नगराध्यक्ष हे नगरसेवक असल्याने ते मतदान करु शकतात. या निवडणुकीत समसमान मते पडल्यास नगराध्यक्षांना निर्णायक मत (कास्टींग व्होट) देण्याचा अधिकार आहे. कोणत्याही परिस्थितीत ही विशेष सभा तहकूब करता येणार नाही. त्यामुळे या निवडीकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम सोबतच जाहीर होईल अशी अटकळ होती. मात्र तसे न झाल्यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम काही दिवसांत स्वतंत्रपणे जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.