maharashtra

साताऱ्यात लगबग गौरी आगमनाची; दीड दिवसाच्या बाप्पांना निरोप

फराळाच्या पदार्थांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला गणरायाचे घरोघरी आगमन झाले. आता समस्त महिलांना येत्या शनिवारी आगमन होणाऱ्या ज्येष्ठा गौरीच्या स्वागताचे वेध लागले आहेत.

सातारा : भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच गणेश चतुर्थीला गणरायाचे घरोघरी आगमन झाले. आता समस्त महिलांना येत्या शनिवारी आगमन होणाऱ्या ज्येष्ठा गौरीच्या स्वागताचे वेध लागले आहेत. त्यामुळे गौरीचं स्वागत परंपरेनुसार होण्याकरिता फराळाच्या पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. तीन दिवस हा सोहळा मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात विविध पक्वान्ने, नैवेद्य, महाआरती इत्यादी माध्यमातून साजरा होणार आहे.
यंदा महिला वर्गामध्ये उत्साहाची मोठी लहर असून हा आनंद सोहळा अधिक जोमाने साजरा करायचा असे सुवासिनींनी ठरवले आहे. गौरी पुढची सजावट, गौरीचे पारंपारिक देखणे स्वागत याकरिता गौरीच्या आकर्षक आणि वेगळा मुखवट्यांना बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सातारा शहरातील राजवाडा, सदाशिव पेठ, मोती चौक, पोवई नाका येथील विविध वस्तूंचे स्टॉल्स लक्ष वेधून घेत आहेत. अनेक घरांमध्ये गौरीचे मुखवटे दरवर्षी गणपती मूर्ती बरोबर विसर्जन केले जातात. नवीन मुखवटे खरेदी केले जातात. शाडू मातीचे, पितळेचे, प्लास्टर ऑफ पॅरिस इत्यादी प्रकारचे मुखवटे स्टॉलवर विक्री दाखल आहेत
गौरीना नेसवण्यात येणाऱ्या आकर्षक साड्या, त्यांच्या गळ्यातील दागिने, मंगळसूत्र, नेकलेस, बाजूबंद, कंबर पट्टे, माळा, लक्ष्मी हार, मोत्यांची माळ, कानातले टॉप्स, रिंगा, झुबे, छोट्या दागिन्यांची खरेदी महिला मोठ्या उत्साहाने करताना दिसत आहेत. याशिवाय गौरीच्या महानैवैद्यासाठी सोळा भाज्या, कोशिंबिरी, 16 चटण्या, पंचपक्वान्न, लाल भोपळा, शेपू, पालक, चुका, कारले, घोसाळे, कोबी, बटाटा, वांगी, चाकवत, मुळा, इत्यादी भाज्यांची खरेदी, याशिवाय फराळामध्ये चकली, करंजी, शंकरपाळे, अनारसे इत्यादी फराळ साहित्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असून बाजारपेठेत विविध मिठाईच्या दुकानात व्यापाऱ्यांनी या पदार्थांची आकर्षक मांडणी केली आहे.
दरम्यान सातारा शहरात दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. या विसर्जनासाठी भवानी तलाव, मंगळवार तळे, दगडी शाळा, बुधवार नाका परिसर, आयुर्वेदिक गार्डन येथे विसर्जनाची सोय करण्यात आली होती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे म्हणत गणेश भक्तांनी गणरायाला परंपरेप्रमाणे निरोप दिला.