maharashtra

कोवळे ऊन आणि रिमझिमत्या पावसात फिटनेस साठी धावले मॅरेथॉनपटू

जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाली स्पर्धेला सुरुवात; पुरुष गटात प्रल्हाद घनवट, तर महिला गटात रेश्मा केवटे यांनी मारली बाजी

कधी कोवळे ऊन, तर कधी रिमझिमता पाऊस अशा कुंद वातावरणात शरीराचा दमसास राखण्यासाठी तब्बल साडेसात हजार स्पर्धक रविवारी सातारा हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने धावले. यंदाच्या अकराव्या मॅरेथॉन स्पर्धेला देशी आणि परदेशी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या  आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात या स्पर्धला पारंपारिक कोंदण लाभले.

सातारा : कधी कोवळे ऊन, तर कधी रिमझिमता पाऊस अशा कुंद वातावरणात शरीराचा दमसास राखण्यासाठी तब्बल साडेसात हजार स्पर्धक रविवारी सातारा हिल मॅरेथॉनच्या निमित्ताने धावले. यंदाच्या अकराव्या मॅरेथॉन स्पर्धेला देशी आणि परदेशी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांच्या  आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात या स्पर्धला पारंपारिक कोंदण लाभले. या मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने सातार्‍याने पुन्हा एकदा आपला जागतिक दर्जाचा बेंच मार्क निश्चित केला.
सातारा रनर्स फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी साडेसहा वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या स्पर्धेचा प्रारंभ पोलीस परेड ग्राउंड येथून सकाळी साडेसहा वाजता झाला. यानंतर ही स्पर्धा पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद शाहू चौक, माची पेठ, अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदा, पावर हाऊस, यवतेश्वर घाटातून हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हिल रिसॉर्ट व नित्यमुक्त साई रिसॉर्ट पर्यंत जाऊन पुन्हा माघारी त्याच मार्गाने पोलीस परेड ग्राउंड येथे समाप्त झाली.
ही स्पर्धा नियोजनबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी, औषधे, बिस्किटे, वेदनाशामक, स्प्रे कुलिंग स्टेशन इत्यादींची व्यवस्था करण्यात आली होती. कधी पाऊस तर कधी ऊन अशा कुंद वातावरणामध्ये हजारो स्पर्धक आणि विशेषतः सातारकर स्वतःचा फिटनेस संतुलित ठेवण्यासाठी उत्स्फूर्तपणे धावले. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये 7 हजार 400 स्पर्धकांनी नोंदणी केली होती.
अनेक स्पर्धकांनी सातारा ते यवतेश्वर हा धावमार्ग नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत अनुकूल आणि नैसर्गिक चढणीचा असल्याचे मान्य केले. स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी ठिकठिकाणी संयोजक त्याचबरोबर ढोल ताशे आणि हलगी यांचा निनाद कडाडला. अशा उत्साही वातावरणामध्ये स्पर्धकांसाठी सातारकरांनी वातावरणामध्ये चांगलाच रंग भरला. पोलीस कर्मचार्‍यांसाठी सुद्धा फूड पॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धकांना जर त्रास झाला तर प्रथमोपचार कसा करावा, याचे प्रशिक्षण घेतलेले सव्वादोनशे स्वयंसेवक या स्पर्धेत ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. तसेच सातारकर आणि स्पर्धकांना जर काही त्रास झाला तर अगदी काही हॉस्पिटलमध्ये राखीव बेडची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.
या स्पर्धेमुळे संपूर्ण सातारा शहर मॅरेथॉनमय झाले होते. पॉवर हाऊसच्या घाटातून संपूर्ण देशभरातून आलेले आणि सातारकर स्पर्धक लयबद्ध पद्धतीने धावतानाचे सुंदर दृश्य यावेळी दिसून आले. वरूण राजाच्या साक्षीने यंदाच्या 11 व्या मॅरेथॉनचा अत्यंत सुंदर मनोहर देखावा अनेक परदेशी छायाचित्रकारांनी आपल्या कॅमेर्‍यामध्ये टिपला.
या स्पर्धेचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेल्या हाफ हिल मॅरेथॉन मध्ये केवळ बारा सातारकर सहभागी झाले होते. यंदा रेकॉर्ड ब्रेक स्पर्धकांची नोंद झाली. तब्बल 7 हजार 400 स्पर्धकांनी या मॅरेथॉनच्या निमित्ताने यवतेश्वर घाटाच्या दिशेने धाव घेतली. निसर्गरम्य डोंगर रस्ता आणि त्याची नैसर्गिक धाटणीची चढण यामुळे ही स्पर्धा जगभरातील स्पर्धकांच्या पसंतीला उतरली आहे. सातार्‍याच्या क्रीडा लौकिकाला वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सातारा रनर्स फाउंडेशन गेले दशकभर झटत आहे. या स्पर्धेसाठी वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही अत्यंत चोख यंत्रणा राबवली होती.

पुरुष गटात प्रल्हाद घनवट ठरले स्पर्धेचे विजेते
पुरुष गटात ही स्पर्धा प्रल्हाद रामसिंग घनवट या औरंगाबादच्या स्पर्धकाने जिंकली. धनावत हे भारतीय सैन्यदलात कार्यरत असून जबलपूर, मध्यप्रदेश येथे सेवा बजावत आहेत. त्यांनी ही स्पर्धा 1 तास 9 मिनिटांत पूर्ण केली. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक करीत सातारकर नागरिकांनी दिलेल्या प्रोत्साहनाबाबत सातारकर नागरिकांचे आभार मानले आहेत. स्पर्धेत दुसरा येण्याचा मान सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असणार्‍या मांढरदेव येथील कालिदास हिरवे यांनी जिंकली. त्यांनी ही स्पर्धा 1 तास 12 मिनिटांत पूर्ण केली. स्पर्धेत तिसरा क्रमांक कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील परशुराम भुई यांनी पटकावला. त्यांनी हे अंतर 1 तास 17 मिनिटांत पूर्ण केले.

महिला गटात माण चाच डंका...
महिला गटात सातारा जिल्ह्यातील माणच्याच कन्येने बाजी मारली आहे. म्हसवडच्या रेश्मा केवटे यांनी ही स्पर्धा 1 तास 24 मिनिटांत पूर्ण केली. त्यांनी 2020 च्या स्पर्धेतही सातार्‍यात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी ही स्पर्धा 1 तास 32 मिनिटांत पूर्ण केली होती. यापुढे जात 42 किलोमीटरच्या अशियाई चॅम्पियनशीपसाठी त्या तयारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मॅरेथॉन स्पर्धेत धावताना कोल्हापुरातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत आज धावताना कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणार्‍या तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी सातारा येथे घडली. कोल्हापुरातील मार्केट यार्ड परिसरात राहणार्‍या राज क्रांतीलाल पटेल (वय 32) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचे राज पटेल हे देखील सहभागी झाले होते. या स्पर्धेतील 21 किलोमीटरसाठी धावत असताना परतीच्या मार्गावर अगदी शेवटच्या पॉईंटला पारंगे चौकात राज पटेल अचानक कोसळले. त्यांना तातडीने ऍम्ब्युलन्समध्ये घालून हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.