maharashtra

ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलींची चोरी करणारा जेरबंद

१५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

औंध, ता. खटाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलींची चोरी करणाऱ्या एकास जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सातारा : औंध, ता. खटाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलींची चोरी करणाऱ्या एकास जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० जानेवारी २०२३ रोजी औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ट्रॅक्टरसह दोन ट्रॉलींची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या चोरीचा छडा लावण्याचा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्याची ओळख पटवली. संबंधित चोरटा माळशिरस, जि. सोलापूर येथे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने माळशिरस येथे जाऊन दाजी उर्फ भागवत धुळा खरात, वय ४२, रा. चाकुर, ता. माळशिरस याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून ट्रॅक्टरसह दोन ट्रॉल्या असा एकूण १५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत पुसेसावळी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहाय्यक पोलीस फौजदार बापुसाहेब जाधव, सुभाष डुबल पोलीस कॉन्स्टेबल किरण जाधव, सागर पोळ यांनी सहभाग घेतला.