शिरवळ, ता. खंडाळा येथे बिबेवाडी, पुणे येथील एकाचा डोक्यात गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसांनी आज पुणे येथे अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिरवळ पोलिसांनी यापूर्वीच या खून प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे.
सातारा : शिरवळ, ता. खंडाळा येथे बिबेवाडी, पुणे येथील एकाचा डोक्यात गोळ्या घालून खून केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या माथाडी कामगार नेत्याला शिरवळ पोलिसांनी आज पुणे येथे अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व शिरवळ पोलिसांनी यापूर्वीच या खून प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणातील अटकेतील संशयितांची संख्या सातवर पोहोचली आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० फेब्रुवारी रोजी ७.१० वाजण्याच्या सुमारास अजित सुरेश भटे, रा. लेक पॅलेस, फुल मळा, शिरवळ यांनी शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पाटणकर यांना लेक पॅलेस टेरेसवर एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती दिली होती. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता अज्ञात इसमाने त्या व्यक्तीचा गोळी मारून खून केला असल्याचे दिसून आले. याबाबत पोलिस निरीक्षक सतीश आंदेलकर यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान मृताचे नाव संजय पाटोळे, रा. बिबेवाडी, पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरवळ पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत या खून प्रकरणातील तरबेज महंमद सुतार वय ३१ वर्षे रा. ओमसाई अपार्टमेंट वरखडेनगर, कात्रज, पुणे, विकी राजेंद्र जाधव रा. वानवडी केदारीनगर, पुणे. शंकर अश्रुबा पारवे उर्फ तात्या पारवे रा. अंबामाता मंदिर सुखसाखर नगर, बिबेवाडी पुणे. नितीन संषीत पतंगे रा. अप्पर कोंडवा रोड, साईनगर बिबेवाडी पुणे. राकेश सुरेश गायकवाड रा. आनंदनगर, मार्केटयार्ड पुणे, किरण बबनराव साळने रा.आंबेगांव पठार पुणे अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे होती. या प्रकरणाचा तपास शिरवळ पोलिस पुणे येथे करत असताना महाराष्ट्र प्रदेश भाजपचा माथाडी कामगार नेता अमोल हुलावळे याला आज याच खून प्रकरणी शिरवळ पोलिसांनी अटक केली आहे.