maharashtra

मटकाकिंग समीर कच्छी याला अटक केल्यानंतर तक्रारदारांची पोलिसांकडे रांग

त्याच्यासह टोळीवर सावकारी व दरोड्याचा गुन्हा दाखल

मटकाकिंग समीर कच्छी याला जुगार प्रकरणी तालुका पोलिसांनी अटक केल्यानंतर तक्रारदारांची पोलिसांकडे रांग लागली असून त्याच्यासह टोळीवर सावकारी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सावकारीचे पैसे देत नसल्याने तक्रारदार यांना जबरदस्तीने मटका घेण्याचे काम लावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सातारा : मटकाकिंग समीर कच्छी याला जुगार प्रकरणी तालुका पोलिसांनी अटक केल्यानंतर तक्रारदारांची पोलिसांकडे रांग लागली असून त्याच्यासह टोळीवर सावकारी व दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सावकारीचे पैसे देत नसल्याने तक्रारदार यांना जबरदस्तीने मटका घेण्याचे काम लावले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी मटका बहाद्दरांच्या मुसक्या आवळल्याने गुन्हेगारी जगतात खळबळ उडाली असून अनेक टोळ्या रडारवर आल्या आहेत.
समीर सलीम शेख उर्फ कच्छी (रा. मोळाचा ओढा, सातारा), साहिल शेख अर्फ भैय्या, अक्षय तळेकर, अमर पवार, वृषभ राउत अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुक्यातील एकाने तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, यातील तक्रारदार यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी संशयित समीर कच्छी याच्याकडून 5 लाख रुपये व्याजाने घेतले. वास्तवीक कच्छीकडे कोणत्याही व्याजाचा परवाना नाही. व्याजाने घेतलेली रक्कम फेडत असताना संशयितांनी आणखी पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तक्रारदार पैसे देत नसल्याचे पाहून संशयितांनी त्यांना जबरदस्तीने मटका, जुगार एजंटचे काम करण्यास सांगितले. संशयितांनी दमदाटी, शिवीगाळ व मारहाण केल्याने अखेर तक्रारदार यांनी तेही काम करण्यास सुरुवात केली.
पैसे सर्व दिल्यानंतरही संशयित व्याजाची रक्कम शिल्लक असल्याचे सांगून तक्रारदार व त्यांच्या पत्नीला दमदाटी करुन मारहाण करत होते. ही सर्व घटना दि. 1 सप्टेबर 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत घडली आहे. या वेळी संशयितांनी तक्रारदार यांच्या घरात घुसून जबरदस्तीने 10 हजार घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरुन पोलिसांनी दरोडा, सावकारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.