कलाशिक्षकाच्या काव्य चित्रांची इंडिया बुकमध्ये नोंद
बाबासाहेब पवार यांची कलाकृती : महाराष्ट्र बुकसह एशिया बुकनेही घेतली दखल
विंग, ता. कराड येथील कलाशिक्षक बाबासाहेब पवार यांनी कोरोनाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर झालेला परीणाम काव्य चित्रांद्वारे जगासमोर मांडला आहे. त्यांनी "बागुलबुवा" या काव्य-चित्र शुभेच्छा पत्राद्वारे विविध संदेश दिले असून या काव्य चित्रांची नोंद 'इंडिया बुक ऑफ' रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
कराड : विंग, ता. कराड येथील कलाशिक्षक बाबासाहेब पवार यांनी कोरोनाचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर झालेला परीणाम काव्य चित्रांद्वारे जगासमोर मांडला आहे. त्यांनी "बागुलबुवा" या काव्य-चित्र शुभेच्छा पत्राद्वारे विविध संदेश दिले असून या काव्य चित्रांची नोंद 'इंडिया बुक ऑफ' रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
जगभरात कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे. हीच परिस्थिती कलाशिक्षक बाबासाहेब पवार यांनी रेखाटलेल्या काव्य-चित्र शुभेच्छा पत्राद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. "बागुलबुवा" या काव्य-चित्र शुभेच्छा पत्राद्वारे त्यांनी २०२२ या नवीन वर्षासह मकर संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुकसह एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येही घेण्यात आली आहे.
बाबासाहेब पवार हे विंग येथे पी. जी. व्ही. पी. हायस्कूलवर कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना कलेची फार आवड आहे. त्याद्वारे विविध छंद जोपसण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यांनी टाकाऊ लग्नपत्रिका आणि वृत्तपत्राच्या रद्दीपासून गणेशमूर्ती साकारल्या आहेत. तसेच त्यांचा १३ वर्षापासून नवनिर्मितीचा वेध घेत अनोखे भेटकार्ड तयार करण्याचा उपक्रमही सुरू आहे. चित्रकलेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नावर प्रबोधन करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
त्यानुसार त्यांनी २०२२ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा कार्डवर कोरोना महामारीमुळे जगातील उद्ध्वस्त झालेले शिक्षण, बंद शाळा व शैक्षणिक जीवनावर झालेले परिणाम आदींवर भाष्य केले आहे. त्यांनी कलात्मकतेचा वापर करून काव्य-चित्र शुभेच्छा पत्राद्वारे दिलेल्या अनोख्या संदेशाची दखल महाराष्ट्र बुकसह एशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.
या "बागुलबुवा" काव्य-चित्र शुभेच्छा पत्रामध्ये त्यांनी पर्यावरण वाचवा, लेक वाचवा, ग्लोबल वॉर्मिंग, बळीराजाच्या व्यथा मांडून समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत. तसेच "धडाडणारं काळीज", काळजाला भिडणाऱ्या "सूर्य" या कवितेतून त्यांनी महापूरातील शेतकऱ्यांची वस्तुस्थिती मांडली आहे. तसेच २०२० मध्येतरी शेतकऱ्यांना सुख-समृद्धी मिळावी, ही भावना त्यांनी त्यांच्या कलाविष्कारातून व्यक्त केली होती.
कलाशिक्षक बाबाबसाहेब पवार यांच्या या संकल्पनेची आणि त्यांच्या अनेख्या कलेची आत्तापर्यंत कराड तालुक्यासह जिल्हाभरातून अनेक मान्यवरांनी कौतूक केले आहे. तसेच त्यांनी नुकत्याच बनवलेल्या काव्य-चित्र शुभेच्छापत्र या उपक्रमाची नोंद कराड येथील शब्दवेध संस्थेनीही घेतली आहे.


