maharashtra

जिल्ह्यात हर हर शंभू महादेवाचा गजर

महाशिवरात्र पारंपारिक पद्धतीने साजरी

Har Har Shambhu Mahadev's jagar in the district
सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. शिव आराधना, रुद्रपठण, जलाभिषेक अशा पारंपारिक विधीद्वारे भाविकांनी शंभू महादेवाची आराधना केली. जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनांसाठी गर्दी केली होती.

सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मंगळवारी महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी करण्यात आली. शिव आराधना, रुद्रपठण, जलाभिषेक अशा पारंपारिक विधीद्वारे भाविकांनी शंभू महादेवाची आराधना केली. जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनांसाठी गर्दी केली होती.
सातारा शहरातील कोटेश्वर, यवतेश्वर, गणकेश्वर, बहुलेश्वर, कृष्णेश्वर, लिंब गोवे कोटेश्वर, वासोटा किल्ल्यावरील नागेश्वर, शिखर शिंगणापूर, क्षेत्रमाहुली येथील रामेश्वर मंदिर अशा विविध ठिकाणी शिवमंदिरात सकाळी ५ वाजल्यापासूनच भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती. पिंडीवर वाहण्यात येणाऱ्या बेलाला आज बाजारात मोठी मागणी होती. संगम माहुली येथील काशी विश्वेश्वर, कोटेश्वर व यवतेश्वर, काशी विश्वेश्वर मंदिराची रंगरंगोटी करण्यात येऊन विद्युत रोषणाईनी मंदिरांचा परिसर झळाळला. यवतेश्वर मंदिरात शिवस्त्रोत पठण, जलाभिषेक, शिव सूक्त आराधना, पालखी, रुद्रपठण इ धार्मिक विधी पारंपारिक पद्धतीने पार पडले. काही ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिला व पुरुषांनी रांगा लावून दर्शन घेतले. महाशिवरात्र निमित्त शहरातील कोटेश्वर मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती. महिला व पुरुषांना दर्शन घेता यावे, यासाठी वेगवेगळ्या रांगा लावण्यात आल्या होत्या. काशी विश्वेश्वर व बहुलेश्वर मंदिरात यंदाही भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फलटण, शिरवळ, खंडाळा, कोरेगाव, वाई, महाबळेश्वरमध्येही महाशिवरात्रनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे सुद्धा भाविकांची पहाटे पासूनच दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. बामणोली शिवसागर जलाशयापलीकडे रत्नागिरीच्या हद्दीवर नागेश्वर या जिल्ह्यातील सर्वात उंच पर्वत शिखरावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. कोयना अभयारण्याचे घनदाट जंगल व सरळ उंच डोंगर, घसरड्या पाऊल वाटा अशा चित्तथरारक गिर्यारोहणाचा अनुभव घेत हजारो शिवभक्त नागेश्वरला पोहोचले. भक्तांना दर्शन घेता यावे म्हणून तापोळा येथून बोटिंगची व्यवस्था करण्यात आली होती.