maharashtra

खोडद येथे बेकायदा गोवा बनावटीची विदेशी दारु जप्त

दोघांना अटक; 53 लाख 29 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Illegal Goa-made foreign liquor seized at Khodad
खोडद, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा गोवा बनावटीची विदेशी दारुची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 53 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सातारा : खोडद, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा गोवा बनावटीची विदेशी दारुची वाहतूक करणारा आयशर ट्रक पकडण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 53 लाख 29 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा येथील राज्य उत्पादन शुल्काचे भरारी पथक दि. 26 जून रोजी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या खोडद गावच्या हद्दीत गस्त घालत असताना आयशर ट्रक क्र. एमएच 14 एफटी 9614 संशयितरित्या दिसून आल्याने त्या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारुच्या एकूण 26 हजार बाटल्या (750 बॉक्स), दोन मोबाईल, दारुचे बॉक्स लपविण्यासाठी वापरण्यात आलेल्या काजूच्या टरपलांच्या 47 गोण्या असा एकूण 53 लाख 29 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी मुकेश मोहनलाल सिसोदिया (वय 39, रा.खजुरीया ता.हातोड जि.इंदोर, मध्यप्रदेश), जितेंद्र भरतसिंग राठोड (वय 36, रा. मेथवाडा ता.डेपालपूर जि.इंदोर मध्यप्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता ही दारु गोवा येथून राजस्थान येथे घेवून जाण्यात येणार होती, अशी माहिती त्यांनी दिली. दोघांनाही न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी ठोठावली.
या कारवाईत राज्य उत्पादन शुल्कचे प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर, निरीक्षक संजय दळवी, दुय्यम निरीक्षक किरण बिरादार, रोहित माने, महेश मोहिते, नितीन जाधव, सचिन खाडे, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, किरण जंगम, भीमराव माळी, राणी काळोखे यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी निरीक्षक एन. पी. क्षीरसागर हे करीत आहेत.