लंम्पी रोगाने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना मिळणार सरसकट मदत
आ. शशिकांत शिंदे यांनी दिली सातारा येथील पत्रकार परिषदेत माहिती
जो शेतकरी पशुपालक आहे, ज्यांच्या जनावरांचा लंम्पी रोगाने मृत्यू झाल्याची झाला आहे. अशा जनावरांच्या मालकांना सरसकट मदत देण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मान्य झाली आहे, अशी माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
सातारा : सातारा जिल्ह्यात लंम्पी रोगाने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना सरसकट मदत देण्याची मागणी मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. त्यावर चर्चा झाल्यानंतर जो शेतकरी पशुपालक आहे, ज्यांच्या जनावरांचा लंम्पी रोगाने मृत्यू झाल्याची झाला आहे. अशा जनावरांच्या मालकांना सरसकट मदत देण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मान्य झाली आहे, अशी माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली.
आ. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, जिल्ह्यात २२१ जनावरांचा लंम्पी रोगाने मृत्यू झाला आहे. त्या अल्पभूधारक जनावरांच्या मालकांची नोंदणी करण्यात यावी, असे परिपत्रक शासनाने काढले होते. मुळात हे परिपत्रक राज्यभरासाठी लागू होते. ही बाब लक्षात घेऊन मृत्यू पावलेल्या जनावरांच्या मालकांच्या कुटुंबांना सरसकट मदत मिळावी, अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत केली होती. ती मागणी मान्य झाली आहे. तत्पूर्वी हा विषय मी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उपस्थित केला होता असे सांगून ते पुढे म्हणाले, राज्यात गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यरत होती. मात्र ७ एप्रिल २०२२ पासून या योजनेत खंड पडला. जिल्ह्यातून या योजनेसाठी ९५ प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी ९१ प्रस्तावांना मान्यता मिळाली आहे. ४ प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. मान्यता मिळालेल्या ९१ प्रस्तावांपैकी ७६ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. विमा कंपन्यांकडे १२२ प्रस्ताव प्रलंबित असून संबंधित विमा कंपनीचे काम रद्द केले आहे का? विमा कंपनीने लाभार्थ्यांना अद्याप मदत का दिली नाही? याबाबतची माहिती मी घेत असून लाभार्थ्यांना तात्काळ मदत मिळावी याबाबतचा प्रस्ताव मी मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहे.
आ. शशिकांत शिंदे पुढे म्हणाले, पोलीस भरती संदर्भात शिंदे- फडणवीस यांनी सुतोवाच केले असून भरती प्रक्रियेत एनसीसी बाबत ७.५ म्हणजेच साडेसात गुणांचा निकष आहे. ही एक प्रकारे त्रुटीच आहे. एनसीसी साठी ग्रॅज्युएशन, तर पोलीस भरतीसाठी बारावी पास असा निकष घेऊन एकत्रित भरती केली तरच यातून मार्ग निघू शकतो. माथाडी कामगारांना वाराई देऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठक झाली असून सध्या दिवाळीत सण तोंडावर असल्याने तूर्तास माथाडी कामगार कोणतेही आंदोलन करणार नाहीत. सणानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


