maharashtra

सातारा तालुक्यात फटाक्यांमुळे वणवा नको...!

डॉ. निवृत्ती चव्हाण : दिवाळीचा आनंद साजरा करा, मात्र पर्यावरणाला प्राधान्य द्या

Don't be fooled by firecrackers in Satara taluka ...!
सातारा जिल्ह्याला सह्याद्रीने वेढले आहे. याबाबत प्रत्येकाचा उर भरुन येतो. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या रांगा पाहायला मिळतात. आपल्या तालुक्याला जल, जमीन आणि जंगल ही त्रिवेणी संगम असणारी पर्वणी लाभली आहे.  हा त्रिवेणी संगम आपल्याला ऊर्जा देऊन जातो.

सातारा :  कोरोनामुळे तब्बल दोन वर्षानंतर सातारा तालुकावासीय प्रथमच अत्यंत आनंद, सुख-समृद्धी, चैतन्यपूर्ण वातावरणात दि. ४ नोव्हेंबर रोजी दिवाळी साजरी करणार आहेत. त्याचा आम्हाला आनंद वाटतो. दिवाळी हा सण साजरा करत असताना सातारा तालुक्यातील डोंगरी भागात आनंदाच्या भरात फटाक्यामुळे वणवा लागणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. दिवाळी हा आपल्या संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मात्र पर्यावरण असेल तर आपण असू, हे एक सत्य वास्तव आहे. त्यामुळे तालुक्यातील डोंगरी भागात फटाक्यांमुळे वणवा लागणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे अहवाल सातारा तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनात म्हटले आहे, सातारा जिल्ह्याला सह्याद्रीने वेढले आहे. याबाबत प्रत्येकाचा उर भरुन येतो. सातारा तालुक्यातही अनेक ठिकाणी सह्याद्रीच्या रांगा पाहायला मिळतात. आपल्या तालुक्याला जल, जमीन आणि जंगल ही त्रिवेणी संगम असणारी पर्वणी लाभली आहे.  हा त्रिवेणी संगम आपल्याला ऊर्जा देऊन जातो. तालुक्यातील यवतेश्वर, कास, परळी खोरे, ठोसेघर पठार, चाळकेवाडी, जगमीन, मालदेव, पांगारे परिसर,  पाटेश्वर, आबापुरी, अजिंक्यतारा किल्ला परिसर हा मुबलक साधन संपत्तीने नटलेला आहे. पाच दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. गेली दोन वर्ष कोरोनाने आपल्या जिल्ह्यात मुक्काम ठोकल्यामुळे अनेक सण साजरा करता आले नाहीत.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे प्रशासनाने अनेक नियम व अटी यांमध्ये शिथिलता आणली आहे. साहाजिकच तब्बल दोन वर्षांनंतर दिवाळी साजरी होणार असल्यामुळे अनेकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दिवाळी म्हटले की, फटाक्यांची आतिषबाजी आलीच. याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र जंगल आणि पठार परिसरातील गावात फटाके वाजवताना अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे जंगलाला वणवा लागू शकतो. त्यामध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, जीवजंतू ,कीटक, औषधी वनस्पती आगीमध्ये भस्मसात होऊ शकतात. वणवा मोठा असेल तर नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होण्या बरोबरच अनेक वन्यप्राण्यांचा जीव जाऊ शकतो. याचा सारासार विचार करून फटाक्यांमुळे वणवा लागणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन निवृत्ती चव्हाण यांनी यावेळी केले.

...तर वन विभागाशी तात्काळ संपर्क साधा
दिवाळीमध्ये फटाक्यामुळे अथवा अन्य कारणांमुळे जंगलामध्ये वणवा लागल्यास तात्काळ संबंधित म्हणजेच वनविभागाशी संपर्क साधावा. तसेच नगरपालिका हद्दीमध्ये वणवा लागला असल्यास तात्काळ नगरपालिकेशी संपर्क साधण्यात यावा. वणवा आटोक्यात आणण्यासाठी सातारा तालुका वनविभागाचे पथक कटिबद्ध आहे, यासाठी जनतेचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे, असे मत निवृत्ती चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.