साताऱ्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकाला बेदम मारहाण
शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
साताऱ्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विजय गुरव या शिक्षकाला एका विद्यार्थ्यांच्या पालकाने आणि मित्रानी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली.
सातारा : साताऱ्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विजय गुरव या शिक्षकाला एका विद्यार्थ्यांच्या पालकाने आणि मित्रानी किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. विजय गुरव यांना उपचारासाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विजय गुरव यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता सहावी मधील बागवान नावाच्या विद्यार्थ्याचे वर्तन वर्गाशी सुसंगत नव्हते. तो सातत्याने वर्गात असताना हातवारे करत असे. त्याला संबंधित शिक्षकाने समज दिली होती व याची मुख्याध्यापकांकडेही तक्रार करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. गुरव यांनी विद्यार्थ्याच्या पालकांना हा प्रकार कानावर घालून त्यांना शाळेत चर्चेसाठी बोलावले होते. या गोष्टीचा राग मनात धरून विद्यार्थ्याच्या पालकानी त्या शिक्षकाला सांगा अन्यथा त्यांना चापटू, अशी धमकी दिली होती.
मंगळवारी अचानक संबंधित विद्यार्थ्यांचे वडिल आणि त्याचा मित्र शाळेत आले आणि त्यांनी संबंधित शिक्षकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. नंतर त्या दोघांनी गुरव यांना जोरदार मारहाण केली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. काही शिक्षकांनी हस्तक्षेप करून हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र मारहाण करणारे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या प्रकारामुळे शाळेतील वातावरण काही काळ तंग झाले होते. शाळेच्या शिक्षकांनी तात्काळ गुरव यांना क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यासंदर्भात शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी या प्रकाराचा निषेध केला असून याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल माहिती घेणार असून या संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. गुरव हे शिक्षक गेली कित्येक वर्षे न्यू इंग्लिश स्कूल येथे इंग्रजी विषयाचे अध्यापन करत असून त्यांचे वर्तन चांगले असताना अचानक हा प्रकार घडल्याने त्यांचे संबंधित सहकारी आणि परिचितांना या घटनेचा धक्का बसला आहे.


