maharashtra

फलटण- पंढरपूर लोहमार्ग मार्गी लागणार : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर


Phaltan-Pandharpur Railway will be routed: MP Ranjitsinh Naik Nimbalkar
ब्रिटिशकालीन फलटण- पंढरपूर लोहमार्गासाठी लवकरच निधीची तरतूद करू, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण : ब्रिटिशकालीन फलटण- पंढरपूर लोहमार्गासाठी लवकरच निधीची तरतूद करू, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह झालेल्या चर्चेत मंत्री वैष्णव बोलत होते. यावेळी खासदार निंबाळकर यांनी फलटण- पंढरपूर लोहमार्गाबाबतच्या सद्यस्थितीचे निवेदन देत माहितीही दिली. फलटण- पंढरपूर हा लोहमार्ग सुरू व्हावा, यासाठी शंभर वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजांच्या काळामध्ये जमिनींचे अधिग्रहण झाले आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षांमध्येही हे काम अजूनपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही.
तत्कालीन माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार केंद्र शासनाबरोबरच ५० टक्के वाटा उचलायला तयार आहे, अशा पद्धतीचे पत्र केंद्र सरकारकडे पाठवले होते; परंतु राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. जमिनीचे अधिग्रहण व सर्वेक्षण पूर्ण होऊनही पुढील कुठलीही कार्यवाही झाली नाही. विठ्ठलाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यामुळे महाराष्ट्रातल्या व देशातील पांडुरंगाच्या भक्तांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आषाढी, कार्तिकीसह लाखो भाविक लोक माघ, श्रावण महिन्यात व नियमितपणेही पंढरपूरला भेट देत असतात.
मोदी सरकारने पुणे- फलटण रेल्वे सुरू करून निम्मे काम पूर्ण केले आहे. फलटण- पंढरपूर रेल्वे सुरू झाल्यास संपूर्ण देशातून पंढरपूरमध्ये भाविक येण्यास याची मदत होईल, असे खासदार निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री यांच्या निदर्शनास आणले. यानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने याबाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन निधी देण्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, असा विश्वास खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.