नडशी (कॉलनी, ता. कराड) येथे काल रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी विमल साहेबराव ढेकळे यांच्या घरात घुसून अंदाजे एक तोळे सोने लंपास केले. दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
सातारा : नडशी (कॉलनी, ता. कराड) येथे काल रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी विमल साहेबराव ढेकळे यांच्या घरात घुसून अंदाजे एक तोळे सोने लंपास केले. दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, काल रात्री चोरट्यांनी रात्री दोनच्या सुमारास शिरवडे रेल्वे स्टेशन येथील उत्तम यशवंत कुंभार यांच्या घराची कडी कटावणीच्या साहाय्याने तोडून घरात प्रवेश केला; परंतु घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा बाबासाहेब मुल्ला यांच्या घराकडे वळवला.
काठीच्या मदतीने कडीला आतील बाजूस अडकवलेले कुलूप काढत असताना कुलूप पडल्यामुळे झालेल्या आवाजाने जागे झालेल्या बाबासाहेब मुल्ला यांनी आतून दरवाजा दाबून धरत प्रतिकार केल्याने येथेही चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. नडशी कॉलनी येथील मुख्य रस्त्याच्या कडेलाच विमल ढेकळे यांच्या घरात घुसून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे दागिना हिसकावून घेऊन पळ काढला. दरम्यान, गळ्यातील चैन ओढत असताना ढेकळे जाग्या झाल्या; परंतु चोरट्यांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही.
संदीप थोरात, सुनील घाडगे, ऋषिकेश भांगे यांच्यासह नागरिकांनी चोरठ्यांचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात चोरटे यशस्वी ठरले. दरम्यान, चोरट्यांनी उत्तर कोपर्डे येथेही चोरीचा प्रयत्न केला; परंतु लोक जागे झाल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. शेवटची माहिती हाती येईपर्यंत घडलेल्या घटनेची तक्रार पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेली नव्हती. चोरीच्या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी तळबीड पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली.
तळबीड पोलिस ठाण्याचे कर्मचारी पाटील व शेडगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन नागरिकांसोबत चोरट्यांचा शोध घेतला; परंतु अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.


