maharashtra

एन्काउंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

मुंबईत राज्यपालांच्या हस्ते पदक प्रदान

Encounter specialist Ram Jadhav honored with President's Medal
पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या पोलीस दलात चमकदार कामगिरी बजावलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) व पुसेगाव ता खटाव येथील सुपुत्र राम जाधव यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्द्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.

पुसेगाव : पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या पोलीस दलात चमकदार कामगिरी बजावलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) व पुसेगाव ता खटाव येथील सुपुत्र राम जाधव यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्द्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले. मुंबईतील राजभवनात झालेल्या शानदार समारंभात जाधव यांना सन्मानपूर्वक हे पदक प्रदान करण्यात आले.
पोलीस दलातील अतुलनीय कामगिरीबद्दल जाधव यांचा यापूर्वी २००१ मध्ये राष्ट्रपतींचे शौर्य पदक देऊन सन्मान करण्यात आला. २००२ मध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून विशेष प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. २००९ मध्ये  पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपतींचे गौरव पदक त्यांना प्रदान करण्यात आले. त्यापाठोपाठ २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रपतींचे विशिष्ठ पोलीस पदक जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे पदक वितरणाचे कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आले होते. ते पदक त्यांना समारंभात प्रदान करण्यात आले आहे.  
पोलीस सेवेत तीनवेळा राष्ट्रपती पदक मिळवणारे राम जाधव हे राज्यातील एकमेव आधिकारी ठरले आहेत. मुंबईत सोमवारी झालेल्या या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गेले दोन वर्षे राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झालेल्या ९७ पोलीस अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे, अशी भावना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.