maharashtra

साताऱ्यात गणरायांच्या स्वागताची जय्यत तयारी

शहरात रिमझिमत्या पावसात मांडव उंभारणीला वेग

सातारा शहरात लाडक्या बाप्पांच्या स्वागताची जोरदार तयारी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी रिमझिम पावसात मांडव उभारणीचे काम सुरू असून बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच वर्दळ वाढली. गणपती मूर्ती व गौरीच्या स्टॉल्सवर गर्दी होऊ लागली आहे.

सातारा : सातारा शहरात लाडक्या बाप्पांच्या स्वागताची जोरदार तयारी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी रिमझिम पावसात मांडव उभारणीचे काम सुरू असून बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच वर्दळ वाढली. गणपती मूर्ती व गौरीच्या स्टॉल्सवर गर्दी होऊ लागली आहे.
 गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या... अशी आर्त हाक देत गतवर्षी गणरायाला निरोप दिल्यानंतर गणेशोत्सवाची वाट बघणाऱ्या भक्‍तांच्या लाडक्‍या बाप्पाचा उत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने कुंभारवाड्यात कारागिरांची तर बाजारपेठेत व्यापाऱ्यांची प्रचंड लगबग सुरू आहे . गणपती दागिने, प्रसाद, गणरायाची आकर्षक मूर्ती, षोडषोपचारासाठी पूजा साहित्य, आकर्षक मखरे यांच्या खरेदीची मोती चौक ते पंचमुखी गणपती मंदिर येथे धूम उडाली आहे. शहरातील 230 आणि हद्दवाढीतील 53 अशा 283 गणपती मंडळांसाठी पालिकेने ऑनलाईन परवाना पध्दत सुरू केली आहे. आज अखेर 34 गणेश मंडळांनी ऑनलाईन परवाने घेतले आहेत.
गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी भाविकही तयारीला लागलेत. अगदी मूर्ती बनविणाऱ्या कारागिरांपासून गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि घरात चिमुकली मंडळी देखील तयारीत गुंतले आहेत. मूर्तिकार शेवटचा हात फिरविण्यात मग्न आहेत; तर मंडळाचे सभामंडप उभारणीच्या कामांना वेग आल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रीगणेशाचे 31ऑगस्टला वाजतगाजत आगमन होणार असल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे. ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा करण्याची तयारी प्रामुख्याने मोठ्या मंडळांची सुरू आहे. स्थापनेसाठी सभा मंडप आणि सजावटीचे कामाने वेग घेतला आहे. मोठमोठ्या मंडळांकडून रात्रंदिवस सजावटीचे काम सुरू आहे

मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात
गणेशमूर्ती बनविण्याचे काम गेल्या एक- दीड महिन्यांपासून सुरू आहे. बहुतांश गणेशमूर्ती तयार होऊन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत, मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जात आहे. रात्री उशिरापर्यंत कारागिरांकडून मूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहेत. शहरासह बाहेरगावातील मंडळांकडून मूर्तीची नोंदणीही होताना दिसत आहे. काही मंडळांद्वारे महिन्यापूर्वीच नोंदणी झाली आहे. तर काही मंडळांकडून तयार झालेली मूर्ती आतापासूनच नेण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांचीही धावपळ वाढली
बाप्पाच्या आगमनाची सर्वांना ओढ लागली असून, स्वागतासाठी सारेचजण तयारीला लागले आहेत. यात सर्वांत जास्त लगबग ही गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची वाढलेली पाहण्यास मिळत आहे. भाविकांना आकर्षित करण्यासाठी साकारण्यात येत असलेल्या आरासचे काम पूर्ण करण्यात कारागीर देखील व्यस्त आहेत. शिवाय, दहा दिवसांच्या उत्सवात लागणाऱ्या साऱ्या वस्तूंची जमवाजमव करणे; भटजी, मंडप, साऊंड सिस्टिम याचे बुकिंग यापूर्वीच झाले आहे.