रस्त्यावर मुलाचा वाढदिवस साजरा करणे माजी नगरसेवकास भोवले
सदरबझार परिसरातील घटना; माजी नगरसेवकासह चौघांवर गुन्हा
लक्ष्मी टेकडी, सदरबझार येथे गर्दी जमवून विना परवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी माजी नगरसेवक पित्यासह त्याच्या पुत्रावर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी यामध्ये लाउडस्पीकरचे साहित्य जप्त केले आहे.
सातारा : लक्ष्मी टेकडी, सदरबझार येथे गर्दी जमवून विना परवाना वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी माजी नगरसेवक पित्यासह त्याच्या पुत्रावर गुन्हा दाखल करुन चौघांना अटक केली. दरम्यान, पोलिसांनी यामध्ये लाउडस्पीकरचे साहित्य जप्त केले आहे.
सुरज सुखपाल सोळंकी मुलगा अमित सोळंकी (रा.सदरबझार), उमाकांत नागे, उमेश गायकवाड (रा.जुनी भाजी मंडई, सदरबझार) यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, सुरज सोळंकी यांच्या मुलाचा वाढदिवस दि. 19 रोजी होता. यासाठी त्यांनी विना परवाना आयोजन केले. लाउडस्पीकर, गर्दी यामुळे परिसर दणाणून गेला. लक्ष्मी टेकडी परिसरातील या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप मोरे, पोलिस हवालदार राहूल खाडे, सुनील कर्णे, संतोष कचरे, विजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहताच अनेकजण पसार झाले.
पोलिसांनी याप्रकरणी लाउडस्पीकर जप्त करुन घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर त्यानुसार संबंधितांना ताब्यात घेवून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरे करणे. विना परवाना फ्लेक्स लावणे. मोटारसायकल रॅली काढणे याला बंदी असून तसे कोणी केल्यास गुन्हा दाखल करुन अटक करणार असल्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.


