maharashtra

टपाल विभागाच्या वतीने असंघटित कामगारांसाठी ई-श्रम कार्ड सुविधा

जिल्ह्यातील असंघटित कामगारांची होणार मोफत नोंदणी : अपराजिता म्रिधा

E-labor card facility for unorganized workers on behalf of Postal Department
केंद्र सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी व शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड (श्रमिक कार्ड) द्वारे नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी टपाल विभागाद्वारे असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करून ई-श्रम कार्ड देण्यात येणार असल्याचे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधीक्षका अपराजिता म्रिधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सातारा : केंद्र सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी व शासकीय अनुदान देताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी असंघटित कामगारांची ई-श्रम कार्ड (श्रमिक कार्ड) द्वारे नोंदणी करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी टपाल विभागाद्वारे असंघटित कामगारांची मोफत नोंदणी करून ई-श्रम कार्ड देण्यात येणार असल्याचे टपाल विभागाच्या वरिष्ठ अधीक्षका अपराजिता म्रिधा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
केंद्र सरकारच्या योजनेद्वारे टपाल विभागाच्यावतीने श्रमिक कार्ड नोंदणी केल्यास असंघटीत कामगारांना सरकारकडून एका वर्षांसाठी ‘पीएमएसबीवाय’ द्वारे विमा मोफत दिला जाणार आहे. दोन लाख विमा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख विमा देण्यात येणार आहे. तसेच एक लाख विमा आंशिक अपंगत्व आल्यास दिला जाणार आहे. असंघटित कामगारांना केंद्र व राज्य सरकारद्वारे मिळणाऱ्या विविध सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. सरकार असंघटित कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेवून त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देईल. तसेच असंघटीत कामगारांसाठी अनेक योजना व संधी उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकार विचाराधीन आहे. हे कार्ड संपूर्ण देशात ग्राह्य धरले जाते. दरम्यान, श्रमिक लेबर कार्ड (ई-श्रम) शेतकरी, शेतमजूर, पशुपालन करणारे, सेल्समन, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, किराणा, बेकरी, पानपट्टी, इत्यादी सर्व दुकानदार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षा चालक, घरकाम करणारे कामगार, आशा वर्कर, दूध उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्रचालक, स्थलांतरित कामगार, अंगणवाडी सेविका, खाजगी क्लासेस संचालक, विडी कामगार या सारखे कामगारांना काढता येणार आहे. त्यासाठी श्रमिक कार्ड नोंदणी करण्यासाठी पात्र नागरिकांनी जवळील टपाल कार्यालयाला भेट द्यावी अथवा टपाल कर्मचार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन म्रिधा यांनी केले आहे.

श्रमिक लेबर कार्डसाठी नियम
श्रमिक कार्ड काढण्यासाठी ती व्यक्ती १८ ते ५९ वयोगटातील असावी. तसेच आयकर भरणारी नसावी. याचबरोबर हे कार्ड काढण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड, मोबाइल नंबर, बँक पासबुक, शैक्षणिक माहितीसाठी दाखला आदी कागदपत्रे आवश्‍यक असल्याचे टपाल विभागाने सांगितले आहे.