maharashtra

समीर कच्छी सह त्याच्या 46 जणांच्या टोळी वर मोक्का

साहस वार्ता च्या जबरदस्त पाठपुराव्याला यश; सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त

मटका आणि खाजगी सावकारी द्वारे समाज व्यवस्था बिघडवणार्या मटकाकिंग समीर कच्छी सह त्याच्या 46 साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. साहस वार्ता ने प्रथमपासूनच समीर कच्छी याच्या अवैध धंद्यांबाबत शड्डू ठोकून ते धंदे बंद पाडण्याचा चंग बांधला होता. यामध्ये साहस वार्ता च्या निर्भिड वार्तांकनाला यश आले असून सातारकर नागरिकांनी याबाबत साहस वार्ताचे अभिनंदन करीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.

सातारा : मटका आणि खाजगी सावकारी द्वारे समाज व्यवस्था बिघडवणार्या मटकाकिंग समीर कच्छी सह त्याच्या 46 साथीदारांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. साहस वार्ता ने प्रथमपासूनच समीर कच्छी याच्या अवैध धंद्यांबाबत शड्डू ठोकून ते धंदे बंद पाडण्याचा चंग बांधला होता. यामध्ये साहस वार्ता च्या निर्भिड वार्तांकनाला यश आले असून सातारकर नागरिकांनी याबाबत साहस वार्ताचे अभिनंदन करीत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे.
मागील कित्येक वर्षापासून मटकाकिंग समीर कच्छी हा आपल्या मटका व अवैध खासगी सावकारीद्वारे सातारकरांवर दहशतीचे वातावरण निर्माण करीत होता. 450 च्या वर खटले दाखल असलेला समीर कच्छी हा आपल्यावर झालेल्या खटल्यांमधून घाबरुन न जाता पुन्हा नवीन जोमाने आपले अवैध धंद्यांचे साम्राज्य वाढवितच होता. मात्र, याबाबतची कुणकुण साहस वार्ता ला लागताच साहस वार्ता ने याबाबत आपली लेखणी चालवली.
साहस वार्ता च्या निर्भिड वार्तांकनानंतर त्याला काही काळ हद्दपारही करण्यात आले होते. मात्र सुधारेल तो समीर कच्छी कसला? त्याने त्यानंतरही यातून बोध न घेता मटका व अवैध खासगी सावकारी सुरुच ठेवली. त्याच्या अवैध धंद्यांच्या विरोधात साहस वार्ता ची लेखणीही बरसतच होती. त्याने केलेल्या कुकर्मांचा पाढा साहस वार्ता वाचत होते. तत्कालीन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यापासून वर्तमानातील पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडेही साहस वार्ता हे आपल्या निर्भिड वार्तांकनाने समीर कच्छी ही वल्ली काय आहे, हे दाखवून देत होते. याचाच परिपाक म्हणून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अवैध धंद्यांबाबत उघडलेल्या आघाडीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सातारा गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रीत करुन मटका व्यवसाय करणारे, व्याजाने पैसे देवुन सावकारी काणारे, तसेच टोळीची दहशत निर्माण करुन आर्थिक व इतर फायद्याकरीता संघटीतपणे गुन्हे करणार्या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये प्रभावी कारवाई करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सूचना दिलेल्या आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी हा त्याच्या कच्छी गँग च्या साथीदारांच्या मार्फतीने लपुन छपुन पोलीसांच्या नजरेआड राहुन मटका/जुगार सारखे अवैध धंदे चालवुन मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा करुन तो सामान्य कुटुंबातील गरजु लोकांना व्याजाने देवुन सावकारी करुन लोकांची पिळवणुक करीत असल्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. त्यानुषंगाने पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या अधिपत्याखाली खास पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी समीर कच्छी याच्या मोळाचा ओढा सातारा येथील राहत्या घरी मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने अचानक छापा टाकला असता त्याठिकाणी समीर कच्छी व त्याचे साथीदार मटका/जुगार चालवित असताना मिळुन आले. त्यांचे कब्जात एकुण 16 लाख 26 हजार 70 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी व त्याच्या साथीदारांनी कच्छी गँग नावाची टोळी तयार करुन सातारा जिल्ह्यामध्ये मटका जुगार व्यवसायातुन मोठया प्रमाणांत मिळणारा काळा पैसा गरजु लोकांना देवून त्यांच्याकडुन व्याजापोटी जास्त रक्कम वसुल करुन सामान्य लोकांची आर्थिक पिळवणुक करुन, व्याजाचे पैसे न दिल्यास टोळीच्या माध्यमातुन पैशाकरीता अपहरण करुन, मारहाण करुन जबरदस्तीने पैसै काढुन घेवुन टोळीची दहशत निर्माण करीत असल्याबाबत तक्रारदाराने समक्ष पोलीस ठाण्यास येवुन सांगितल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 75/2023 भा.दं.वि.सं. कलम - 395, 397, 363, 364, 365, 452, 323, 504, 506, 420, 354, 109, सह सावकारी अधिनियम कलम 19,45 चिड फंड अँक्ट कलम 76 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा तालुका गुरनं 75/2023 च्या तपासामध्ये समीर कच्छी याच्या कच्छी गँगचे सातारा जिल्ह्याबरोबर गोवा राज्यातील लोकांशी मटका/जुगार कनेक्शन असल्याचे समोर आल्याने वरिष्ठांच्या आदेशान्वये तपासाची सुत्रे जलद गतीने फिरवुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवा राज्यात जावून मडगांव येथे छापा टाकला असता समीर कच्छी व त्याचे गँगचे कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाले. तेथे मिळुन आलेल्या लोकांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन 1 लाख 39 हजार 100 रुपयांचा मुहेमाल हस्तगत करुन त्यांना गुन्ह्याचे कामी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सातारा तालुका पोलीस ठाणे, गु.र.नं. 75/2022 भा.दं.वि.सं. कलम - 395, 397, 363, 264, 28, 07, 323, 504, 506, 420, 354, 109, सह सावकारी अधिनियम कलम 39,45 चिड फंड अँक्ट कलम 76 अन्वये कच्छी गँगने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी या टोळीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती संकलित केली असता समीर कच्छी व त्याच्या गॅगवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये जुगार/मटका चालविणे, जबरी चोरी करणे, दरोडा, खुनाचा प्रयत्न, खुनासाठी अपहरण, गंभीर दुखापत, सरकारी नोकरावर हल्ला, गर्दी मारामारी, फसवणुक, अशा प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने या आरोपींच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाई करीता पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या  मार्फतीने विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला.
कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी हे सातारा जिल्ह्याच्या वार्षिक तपासणीकामी सातारा जिल्ह्यामध्ये आले असताना त्यांनी सदर गुन्ह्याची माहीती घेवुन कागदपत्रांचे अवलोकन करुन मोक्का प्रस्तावाची पडताळणी केली. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापुर यांनी या गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वयेची कलम वाढ करण्याची परवानगी देवुन प्रस्तावास मंजुरी दिली असून गुन्ह्याचा तपास गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगांव यांच्याकडे देण्यात आला आहे.
नोव्हेंबर 2022 पासुन 5 मोक्का प्रस्तावामध्ये 90 जणांविरुध्द मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच 11 इसमांविरुध्द हद्दपारीसारखी व 01 इसमास एमपीडीए कायदयान्वये स्थानबध्द करण्यात आले आहे. तसेच भविष्यातही सातारा जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द मोक्का, हद्दपारी, एमपीडीए अशा प्रकारच्या कठोर कारवाया करण्यात येणार आहेत.
मोक्का प्रस्ताव मंजुरी करीता पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश किंद्रे,उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा ग्रामीण कॅम्प कोरेगांव, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे, स्वप्नील घोंगडे सहा.पोलीस निरीक्षक वाचक पोलीस अधीक्षक सातारा, सपोनि प्रताप भोसले व त्यांचे तपास पथक, सपोनि रमेश गर्जे व त्यांचे तपास पथक तसेच अमित सपकाळ, प्रमोद सावंत, दीपक इंगवले, राजु कांबळे, महेश शिदे, केतन शिंदे या पोलीस अंमलदारांनी मोक्का कारवाईकरीता सहभाग घेतला.