कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार
सैदापूरला लष्करी छावणीचे स्वरूप, अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त
कोल्हापूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार दिनांक 29 रोजी सैदापूर कराड येथे सभा होत असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सैदापूर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
सातारा : पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहा सभा घेऊन महाराष्ट्रात 45 पार चा आकडा गाठण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे तळ दिला आहे. कोल्हापूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार दिनांक 29 रोजी सैदापूर कराड येथे सभा होत असून या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. सैदापूर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. केवळ व्हीआयपी परवानाधारक व्यक्तींना तेथे प्रवेश दिला जात आहे.
देशात चारशे पार आणि महाराष्ट्रात 45 पार करण्यासाठी भाजपने पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुरता जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे, कोल्हापूर, कराड येथे सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. कोल्हापुर येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जोरदार प्रतिसाद मिळाला. क्राउड पुलर म्हणून मोदी यांची ख्याती आहे, ती कोल्हापूरने अनुभवली. सातार्यात कराड येथे दिनांक 29 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सैदापूर च्या निस्तीर्ण मैदानात दुपारी एक वाजता भव्य सभा होत आहे. या सभेसाठी वातानुकूलित तीन दालने उभी करण्यात आली असून किमान एक लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा तसा तगडा बालेकिल्ला राहिला आहे. तो खेचून घेत भाजपचा झेंडा तेथे रोवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना भाजपने रणांगणात उतरवले असून उदयनराजे यांनी सुद्धा सहा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा मास्टर स्ट्रोक काय असणार आहे, याचे चित्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
2019 च्या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी सातार्यात सैनिक स्कूलच्या मैदानावर सभा घेतली होती, मात्र त्यावेळेला पक्षाची पुण्याई कामाला आली नाही. त्यानंतरच्या चार वर्षात भाजपने प्रचंड मोर्चेबांधणी पायाभरणी करून सुमारे 3000 बूथ आणि केंद्र संचालकांचे संघटन उभे केले आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यक्रम या बूथ प्रमुखांच्या माध्यमातून सातत्याने राबवले जात आहेत. महाविकास आघाडीला सातारा जिल्ह्यात जोरदार टक्कर देण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे. सहा विधानसभा मतदारसंघात अजितदादा पवार गट, शिंदे गट, भारतीय जनता पार्टी हे तीनही पक्ष एकवटले असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली ही लढाई लढली जात आहे. स्वतः पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज यांनी 21 सभांचे आयोजन केले आहे. कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण या तीन मतदारसंघाचे 55 टक्के मतदान लक्षात घेता उदयनराजे यांनी सुद्धा या तीन मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपचे मजबूत संघटन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी तसेच नेत्यांचे वेगवेगळे संघटित गट यामुळे प्रदेश कार्यकारणीच्या सूचनेनंतर नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी कराडला पसंती देण्यात आली आहे.
सैदापूरच्या विस्तीर्ण मैदानावर प्रचंड मोठा शामियाना उभारण्यात आला असून लगत हेलीपॅड ची सोय करण्यात आली आहे. हे सर्व शामियाने वातानुकूलित असून किमान एक लाख लोक बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे ग्रामीण येथील पोलीस अधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक , 240 सहायक पोलीस निरीक्षक, तसेच दीड हजार पोलीस कर्मचारी व 1000 सीआरपीएफ चे जवान असा अडीच हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त येथे तैनात आहे.
नरेंद्र मोदी यांची सभा दुपारी एक वाजता सुरू होणार असल्याने भारतीय जनता पार्टीचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, कार्यकर्ते कराडला रवाना झाले आहेत. पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार्या सर्व तयारीची पाहणी करताना पालकमंत्री शंभूराज, प्रदेश कार्यकारणीचे विक्रम पावसकर, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, शिंदे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीने नरेंद्र मोदी यांची सभा यशस्वी करण्यासाठी कंबर कसली आहे. या सभेच्या तयारीत कोणतीही उणीव राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कोल्हापूरच्या भव्य दिव्य सभेनंतर कराडमध्ये अशीच सभा व्हावी अशी कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे. महायुतीचे भव्य प्रदर्शन हे खासदार उदयनराजे भोसले यांना महत्त्वाचे राहणार आहे. त्यावरच मतदारांसाठी एक अनुकूल वातावरण निर्मिती होणार आहे. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून जोर लावला जात आहे.


