७ नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दिवस भारताच्या दृष्टिने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न मुलांच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे.
सातारा : ७ नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दिवस भारताच्या दृष्टिने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न मुलांच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना 'सिम्बाॕल आॕफ नॉलेज' म्हणून संबोधल्या जाणाऱ्या मानवी कल्याणाच्या उदगात्याला आपण अभिवादन करतोय, याचे भान ठेवून तरुणाईने या महामानवाच्या विचारचळवळीसाठी झटले पाहिजे, असे आवाहन विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक अरुण जावळे यांनी केले.
सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस उत्सहात साजरा करण्यात आला. यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून अरुण जावळे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजकल्याण सहाय्य आयुक्त नितीन उबाळे यांनी भूषविले. तर प्राचार्या डॉ. शाली जोसेफ, उपप्राचार्य प्रा. भाई शैलेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
अरुण जावळे पुढे म्हणाले, डॉ, बाबासाहेब आंबेडकरांना जगातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणून जगभर गौरविले जाते. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, कृषीशास्त्र, अर्थशास्त्र, धर्मशशास्त्र, संस्कृतीशास्त्रा, संविधानशास्त्र, मानवशास्त्र, मानववंशशास्त्र, अशा कैक शास्त्रांचा अभ्यास करुन भारतीय समाजाला उन्नत अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निकराचे प्रयत्न केले. ते स्वतःम्हणत असत मी आजन्म विद्यार्थी आहे. त्यामुळे आज विद्यार्थी अन् एकूणच तरुणाईच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव उच्चारातच विद्वत्तेचे चैतन्य सळसळत राहते. ही 'सळसळणारी' अवस्था खेडोपाड्यात आपणाला जीवंत करावी लागेल आणि तेथील विद्यार्थी घडवावा लागेल. हे घडले तर तर तेच खरे महामानवास अभिवादन ठरणार आहे, अशी भावनाही अरुण जावळे यांनी व्यक्त केली.
नितीन उबाळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूण संघर्षाचा अभ्यास करून आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे. समाजकार्य अभ्यासक्रमाकडे केवळ अभ्यासक्रम म्हणून न पाहता समाज्याच्या व्यापक अंगाने त्याकडे पाहिले पाहिजे. तरच समाजाभिमूख समाजकार्य आपल्या हातून घडू शकेल. उपप्राचार्य प्रा. भाई शैलेंद्र माने यांनी प्रास्तविक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन पत्रकार अरुण जावळे यांच्या प्रयत्नांमुळे अस्तित्वात कसा आला हे सांगूत महामानवांच्या जीवनपटावरील अशा ऐतिहासिक घटना - घडामोडींचा संशोधनात्मक इतिहास पुढे आणण्याचे कार्य नव्या पिढ्यांनी करायला हवे, असे स्पष्ट केले. प्रभारी प्राचार्या डॉ, शाली जोसेफ यांनीही आपल्या भावना व्यक्त करत आभार मानले.


