गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात आज सातारा जिल्हावासीयांनी मोठ्या आनंदाने धार्मिक वातावरणात आणि ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्या गणरायाला घरोघरी आणून स्थापन केले.
सातारा : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात आज सातारा जिल्हावासीयांनी मोठ्या आनंदाने धार्मिक वातावरणात आणि ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्या गणरायाला घरोघरी आणून स्थापन केले.
पुढील 11 दिवस हा आनंद सोहळा मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होत आहे.गेले दोन वर्षे करोनाचा कहर आणि जिल्हा प्रशासनाचे निर्बंध यामुळे काहीशी मरगळ आली होती त्यामुळे अनेक उत्सव,सण, धार्मिक कार्यक्रम,मिरवणुका यांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र यावर्षी हे सर्वच निर्बंध झुगारून सातारा जिल्हावासीयांनी आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच ढोल ताशांच्या गजरात घरोघरी गणेश मूर्ती आणून स्थापना केली.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरगुती गणपती स्थापनेसाठी दुपारी 1 एक वाजून 54 मिनिटापर्यंतचा मुहूर्त असल्याने सकाळपासूनच सातारा शहर परिसरात गणेश भक्तांची पूजा साहित्य खरेदीसाठी तसेच नैवेद्य व खिरापतीचे पदार्थ घेण्यासाठी शहरातील राजवाडा, मोती चौक, सदाशिव पेठ परिसरात गर्दी दिसत होती. विविध प्रकारची देशी-विदेशी फळे तसेच माव्याचे मोदक विविध प्रकारातील आंबा मोदक, पिस्ता मोदक, काजू मोदक, स्ट्रॉबेरी मोदक, ड्रायफ्रूट मोदक याशिवाय आंबा बर्फी, खोबरा बर्फी हे पदार्थही मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसत होते.
सातारा शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यातच या मंडळांनी या मोठ्या मूर्ती विसर्जन न करता दरवर्षी पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रदूषणाचा विषय दूर राहिला असून शहरातील मोती चौकातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह मंडळ, सम्राट मंडळ महागणपती, यादव गोपाळपेठेतील राजमुद्रा मंडळाचा सातारचा राजा, केसरकर पेठेतील मयूर सोशल क्लब बाल हनुमान मंडळाची भव्य गणेश मूर्ती, शिवाजी सर्कल पोवई नाका येथील शिवाजी सर्कल गणेश मंडळाची फायबरची गणेश मूर्ती यामुळे निश्चितच प्रदूषण रोखले जात आहे, याचा एक विशेष आनंद पर्यावरण प्रेमींना होताना दिसतो.
सातारा शहरातील सोमवार पेठेतील फुटका तलाव गणेश मंडळांनी प्रतिवर्षाप्रमाणे तलाव परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसर सुशोभित करत हिरव्यागार झाडांच्या बॅकग्राऊंड वर पाण्यात तरंगत्या तराफ्यावर आकर्षक भव्य गणेश मूर्ती स्थापन केली आहे. शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश स्कूल चौकातील सोन्या मारुती गणेश मंडळांनी दक्षिणात्य पद्धतीची निळ्या रंगाची भव्य गणेश मूर्ती स्थापन केली आहे. शहरातील पंचमुखी गणेश मंदिर, राजवाडा परिसरातील अजिंक्य गणेश मंदिर, फुटका तलाव येथील वरदविनायक मंदिर, कृष्णा नगर परिसरातील नटराज मंदिराच्या दाक्षिणात्य भव्य गणेश मूर्तींना विशेष चांदीचे अलंकार घालून पूजा अर्चा करण्यात आली होती.
सकाळपासून होम ,गणपती होम,अथर्वशीर्ष सहस्त्रावर्तन,शोडाशोपचार पूजा,आरती,महा नैवेद्य आधी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळाने रात्री उशिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणरायाची मंडपामध्ये स्थापना केली.
सोमवार पेठेतील माने कुटुंबीयांनी कालिया मर्दन रूपातील नृत्य करणारा श्रीकृष्ण रूपातील गणपतीची ढोल ताशांच्या आणि लेझीम पथकाच्या तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेली मिरवणूक लक्षवेधक आणि विशेष जाणवत होती. एका कुटुंबाने गणरायाच्या स्वागतासाठी साकारलेला सोहळा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत होती.
सातारा शहर परिसरातील खिंडीतला गणपती, गारेचा गणपती, शकुनी गणपती, ढोल्या गणपती, विश्वविनायक मंदिर शुक्रवार पेठ आदी मंदिरांमध्येही गणेश उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूजा साहित्य बरोबरच विविध प्रकारची फळे खरेदीसाठी सातारकरांची राजवाडा परिसरात लगबग दिसून येत होती. दूर्वा, शमीपत्रे, विष्णुकांत, मरवा, केवडा, बेलाची पाने खरेदी करण्यासाठी उत्साह दिसून येत होता.
कोकण परिसरातून विक्रीला आलेली लाल- गुलाबी रंगाची कमळे 20 ते 30 रुपये दराने विकली जात होती.तसेच गजऱ्यांचाही भाव वाढला होता. विविध फुल विक्रेत्यांकडे गणपतीच्या मूर्तीसाठी भव्य हार,तोरणे,मुगुट आणि फुलांच्या सजावटीचे बुके खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसत होती.
येत्या शनिवारी विघ्नहर्ता गणरायाच्या बहिणी अर्थात ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे घरोघरी आगमन होणार असून रविवारी त्यांचे पूजन व सोमवारी विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे. सातारा शहरातील जिल्हा परिषदेच्या राधिका रोड वरील परिसरात प्रशासनाने पालिकेच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती केली असून उद्या दीड दिवसांच्या तसेच गौरीन बरोबर विसर्जन होणाऱ्या गणपती मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सातारा शहर परिसरातील पुणे-बेंगलोर हायवे नजीकच्या परप्रांती विक्रेतांनी विक्री ठेवलेल्या स्वस्त दरातील मूर्ती खरेदी करण्यासाठीही पहाटेपासूनच या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.


