मुंबई कृषी समितीच्या शौचालयाबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली.
सातारा : मुंबई कृषी समितीच्या शौचालयाबाबत तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांची चौकशी करा, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली. दरम्यान यावेळी तक्रारदाराने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आ. महेश शिंदे यांच्यासह अन्य दोघांनी आपल्याला तक्रार देण्यास भाग पाडले असा धक्कादायक आरोप माध्यमांपुढे केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबई कृषी समितीच्या शौचालयाबाबत चौकशी करण्याचे आदेश हिवाळी अधिवेशनात दिल्यानंतर आज आ. शशिकांत शिंदे यांनी नागपूर येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुंबई कृषी समितीच्या शौचालयाबाबत यापूर्वीच न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे उच्चस्तरीय समितीने चौकशी करून राज्य शासनाच्या माध्यमातून त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर केला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शौचालयाबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांनी शौचालयाबाबत तक्रार केली ते तक्रारदार आज माझ्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राजकीय व्देशापोटी, फुस लावून त्यांना तक्रार करण्यास भाग पाडले गेले. मुळात खोटी तक्रार करण्यास लावणाऱ्या तक्रारदाराला आत्महत्येस प्रवृत्त कोणी केले? त्याने आत्महत्या केली असेल तर तो जिवंत आहे का, त्याचा मृत्यू झाला, हे कोणी पाहिले याची चौकशी करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणाच्या पाठीमागे भ्रष्टाचार आहे का त्याला राजकारण करण्यासाठी गुंतवण्याचा प्रयत्न झाला हे तपासणे खूप गरजेचे आहे. तक्रारदाराला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणाऱ्या इसमांची नावे पोलिसांना माहीत आहेत, त्यांची ही चौकशी केली जावी अशी मागणी आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आ. महेश शिंदे यांच्यासह तिघांकडून माझ्या कुटुंबाला धोका : तक्रारदाराचा आरोप
आ. महेश शिंदे, मुंबई कृषी समितीचे संचालक राजेंद्र पाटील आणि एडवोकेट संतोष यादव या तिघांनी मुंबई कृषी समितीच्या शौचालयाबाबत म्हणजेच आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात मला तक्रार करण्यास भाग पाडले. वरील तिघांकडूनही माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे, असा खळबळजनक आरोप तक्रारदाराने माध्यमांपुढे बोलताना केला.
तक्रारदार म्हणाले, आ. शशिकांत शिंदे यांच्या विरोधात आ. महेश शिंदे यांच्यासह तिघांनी क्रिमिनल पिटीशियन फाइल तयार करून मला त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास भाग पडले. त्यानंतर २०२१ साली तिघांनीही मला मंत्रालयाबाहेर त्यांच्या माणसांसमवेत पाठवले. त्यांच्या माणसांनी मला विषाची बाटली दिली. ते विष मी प्राशन केले. मात्र थोडी शुद्ध आल्यानंतर मी रुग्णालयात दाखल झालो. या घटनेत माझा मृत्यू व्हावा, अशी तिघांची इच्छा होती. मी रुग्णालयात उपचार घेऊन वाचलो. तिघांच्या विरोधात मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून माझ्याकडे त्यांच्याविरोधात पुरेसे पुरावे आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित तिघांचीही चौकशी करावी, या तिघांकडून माझ्या कुटुंबाला धोका असून मला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


