maharashtra

विवाहितेचा छळ; पाच जणांवर गुन्हा


Marital harassment; Crime on five people
कराड येथे बंगल्याचे काम करण्यासाठी तसेच पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन वीस लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : कराड येथे बंगल्याचे काम करण्यासाठी तसेच पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरुन वीस लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांवर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विजयकुमार वाइकर, दिलीप वाइकर, रत्नप्रभा वाइकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. हा संपूर्ण प्रकार दि. ३१ डिसेंबर २0१८ ते दि. १0 जानेवारी २0२१ या कालावधीत घडला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयुरी विजयकुमार वाइकर (वय २८, मूळ रा. गणेशकृपा, अयोध्यानगरी कॉलनी, आगाशिवनगर, कराड, जि. सातारा. सध्या रा. नागठाणे, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पती विजयकुमार दिलीप वाइकर, सासरे दिलीप नारायण वाइकर, सासू रत्नप्रभा दिलीप वाइकर (सर्वजण मूळ रा. गणेशकृपा, अयोध्यानगरी कॉलनी, आगाशिवनगर, कराड, जि. सातारा. सध्या रा. नागठाणे, ता. सातारा), नणंद माधुरी विलास शिर्के, नंदवा विलास प्रल्हाद शिर्के (दोघे रा. कुंठेमळा, नऱ्हे, पुणे) या पाच जणांकडून मयुरी वाइकर यांना शारिरीक, मानसिक त्रास दिला जात होता. कराड येथील बंगल्याचे काम करण्यासाठी आणि नांदणेसाठी पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी तू माहेरुन वीस लाख रुपये घेवून ये, असा तगादाही सुरु होता. दरम्यान, पती, सासू, सासरा आणि नणंद या चौघांनी मयूरी यांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच याप्रकारची कल्पना माहेरी कोणालाही सांगायची नाही, असे म्हणत त्यांच मोबाईल हॅण्डसेट फोडून नुकसान केले. त्याचबरोबर मयूरीसह त्यांच्या आई-वडिलांची नातेवाईकांमध्ये बदनामी केली. या सर्व प्रकाराला कंटाळून मयुरी यांनी दि. १५ रोजी दुपारी एक वाजता बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पती, सासू, सासरा, नणंद आणि नंदवा अशा पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास महिला पोलीस हवालदार कुदळे करत आहेत.