मालट्रक चोरीप्रकरणी तारळ्याच्या एकास अटक; एक फरारी
लोणंद पोलिसांची कामगिरी ; गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी जेरबंद
एखादी माहिती प्राप्त झाल्यानंतर लगेच तातडीने कारवाई करण्यासाठी पोलीस दल असते. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई होतच असते. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मालट्रक चोरुन घेवून चाललेल्या एकास मालट्रकसह अटक करण्याची कामगिरी लोणंद पोलिसांनी बजावली आहे.
लोणंद : एखादी माहिती प्राप्त झाल्यानंतर लगेच तातडीने कारवाई करण्यासाठी पोलीस दल असते. गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई होतच असते. मात्र, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मालट्रक चोरुन घेवून चाललेल्या एकास मालट्रकसह अटक करण्याची कामगिरी लोणंद पोलिसांनी बजावली आहे.
दरम्यान, पोलिसांनी चोरीतील 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मालट्रक हस्तगत केला असून पाटण तालुक्यातील तारळ्याच्या दोन महाभागांनी हा ट्रक काशीळ येथून चोरल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 25 रोजी पहाटे सगळे जग साखरझोपत असताना लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांना गोपनीय बातमीदाराकडून साताऱ्याकडून लोणंदच्या दिशेने एक चोरी केलेला मालट्रक येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने सगळ्या लोणंद शहरात नाकाबंदी केली आणि मालट्रकची वाट सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी पाहू लागले.
सकाळी 7 वाजता पोलीस कॉन्स्टेबल गोविंद आंधळे व होमगार्ड गणेश इंगवले यांना लोणंद शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र येथे लाल रंगाचा मालट्रक क्रमांक (एम. एच. 11 एम. 4706) हा येताना दिसला. पोलिसांनी मालट्रकला थांबवले असता ट्रकचा चालक असलेला संतोष देटके (रा. तारळे, ता . पाटण) हा ट्रक सोडून पळून गेला. पोलिसांनी तातडीने ट्रकमध्ये असलेल्या दुसऱ्या प्रशांत अरुण ढवळे (वय 26, रा. तारळे, ता. पाटण) या पळून चाललेल्या युवकाला पकडण्यात यश मिळवले.
त्याच्या ताब्यातील ओपो, रिअलमी कंपनीचे मोबाईल तसेच मालट्रक असा एकूण 2 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याबाबत चौकशी करताना या दोघांनी संबंधित मालट्रक हा काशीळ, ता. सातारा येथून चोरी करुन आणला असल्याचे सांगितले. लोणंद पोलिसांनी मालट्रक व आरोपी ताब्यात घेवून पुढील कारवाईसाठी बोरगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून अशा प्रकारे लोणंद पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल होण्याआधीच आरोपी जेरबंद करण्यात यश मिळवले.
या कारवाईत लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक फौजदार देवेंद्र पाडवी, सहाय्यक फौजदार महेश सपकाळ, पोलीस हवालदार नितीन भोसले, हवालदार किशोरकुमार मिसाळ, हवालदार अतूल कुंभार, हवालदार धनाजी भिसे, गोविंद आंधळे, चालक पोलीस कॉन्स्टेबल संजय चव्हाण तसेच होमगार्ड गणेश इंगवले यांनी सहभाग घेतला होता. या सर्व टीमचे पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांनी अभिनंदन केले आहे.


