कास व महाबळेश्वर साठी पर्यावरण पूरक सर्वसमावेशक आराखडा हवा
खासदार उदयनराजे भोसले यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा; चार सप्टेंबर रोजी होणार कास पठाराचा दौरा
कास पठारावर झालेल्या बांधकामामुळे परिसराचे विद्रूपीकरण वाढले आहे. त्यामुळे रोजगाराभिमुख पर्यटनाला उत्तेजन देणारा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची राज्य सरकार पुढे मांडणी व्हावी व गरज पडल्यास पर्यटन वृद्धीसाठी केंद्र शासनाचाही निधी यासाठी आणला जाईल, अशा स्वरूपाची चर्चा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी केली.
सातारा : सातारा जिल्ह्यातील कास, पाचगणी, महाबळेश्वर या पर्यटन स्थळांसाठी चटई निर्देशांक वाढून मिळावा, अशी येथील स्थानिक नागरिकांची मागणी आहे. पश्चिम घाट, जागतिक वारसा स्थळ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प इत्यादीमुळे येथे रोजगाराला मर्यादा पडत आहेत. तसेच कास पठारावर झालेल्या बांधकामामुळे परिसराचे विद्रूपीकरण वाढले आहे. त्यामुळे रोजगाराभिमुख पर्यटनाला उत्तेजन देणारा सर्वसमावेशक आराखडा तयार करून त्याची राज्य सरकार पुढे मांडणी व्हावी व गरज पडल्यास पर्यटन वृद्धीसाठी केंद्र शासनाचाही निधी यासाठी आणला जाईल, अशा स्वरूपाची चर्चा खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी केली.
या चर्चेची माहिती स्वतः उदयनराजे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. ते पुढे म्हणाले, पाटण, कास, जावली, महाबळेश्वर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न होता म्हणून त्यासाठी ते मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड येथे गेले. महाबळेश्वर, कास, पाचगणी हे पर्यटनाचे केंद्र आहे. येथील एफएसआय वाढून मिळावा, अशी नागरिकांची मागणी आहे. पर्यटनाला चालना द्यायच्या तर लोक सकाळी येतात संध्याकाळी परत जातात. त्यांना तेथे सुविधा मिळायला हव्यात. कास पठारावर बांधकामे झाली, हा परिसर विद्रूप झाला. पश्चिम घाट, जागतिक वारसा स्थळ, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, याच्या जाचक अटी पाहता येथील लोकांनी काय करायचे? जे स्थानिक आहे ज्यांच्या जागा आहे त्यांनी काय खायचे? अशा प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांशी आज साधक-बाधक चर्चा झाली. मात्र ज्यांना नोटीसा काढल्या ते कोणीच येऊन भेटले नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर आम्ही व स्वतः जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी रविवारी कास पठाराचा दौरा करणार आहोत, असे ते म्हणाले.
कोणी कोर्टात जाऊन स्टे ऑर्डर घेतली तर आपण या अतिक्रमणाच्या प्रश्नावर काहीच करू शकणार नाही. त्यासाठी पर्यावरण पूरक बांधकामे आणि त्याचे निर्मितीकरण याकरिता सर्वसमावेशक आराखडा तयार केला जावा, अशी चर्चा जिल्हा प्रशासनाशी केल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, "आमचे सहकारी डॉक्टर प्रताप राजे महाडिक यांच्या माहितीनुसार ऑनको लाईफ येथील हॉस्पिटलमध्ये दिवसाला 60 ते 70 लोक कॅन्सर बाधित होत आहेत. कारखाने यांच्यामुळे होणारे प्रदूषण हे आरोग्याला घातक ठरत आहे. ज्यांचे एसटीपी प्लांट नाहीत ते बंद करायला हवेत. लोकांचे आरोग्य सांभाळले पाहिजे. कास धरणाची उंची वाढल्याने भुशी डॅम पेक्षाही येथे अधिक संख्येने पर्यटक येतील. येथील हॉटेल मधील वेस्ट चे डिस्पोजल मॅनेजमेंट झाले पाहिजे. याचा सहानुभूतीपूर्वक जिल्हा प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी केल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वसमावेशक व पर्यावरण पूरक बांधकाम नियमावलीचा आराखडा तयार करावा. त्याची राज्य शासनापुढे मांडणी करून त्याची परवानगी घ्यावी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन नियमावली अंतिम केली जाईल व गरज पडल्यास केंद्रीय पर्यटनमंत्र्याकडून यासंदर्भात योग्य ती मदत निश्चित केली जाईल, असे आश्वासन उदयनराजे यांनी दिले. अतिक्रमणे जर विद्रूपीकरणाच्या माध्यमातून होत असतील तर अधिकाऱ्यांनी निश्चितच कारवाई केली पाहिजे.
कास पठारावर बांधकाम करणारे हे आमदार-खासदार यांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट केले जात आहे, या प्रश्नावर बोलताना उदयन राजे म्हणाले कोण कुणाला टार्गेट करते हे मला माहीत नाही. माझे तर वैयक्तिक पारधी समाजातील लोकांशी जवळचे हितसंबंध आहेत. त्यांनी काय केलंय का हे माहिती नाही. आपण सकारात्मक वृत्तीने याकडे पाहिले पाहिजे. कास पठारावरील अतिक्रमणाच्या संदर्भात आमदार शिवेंद्रसिंगराजे भोसले यांनी थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या प्रश्नाला उदयनराजे यांनी बगल दिली ते म्हणाले अरेरावीची ची भाषा कोण करत असेल तर प्रशासन कायद्याप्रमाणे ते तोडणारच.
डॉल्बी विषयी बोलताना उदयनराजे म्हणाले, जे काय असेल ते कायद्याप्रमाणे व न्यायालयाच्या निर्णयानुसारच होणार आहे. मुंबई-पुण्यात डॉल्बी लावल्या जातात. मग साताऱ्यात का अडवले जाते? महाराज आहेत म्हणून? तसे असते तर डॉल्बीची गाडी माझ्या गाडीच्या पुढे ठेवली असती आणि मी सगळीकडे फिरलो असतो. ध्वनी प्रदूषणाचाही विचार झाला पाहिजे. डॉल्बी शासनाने विकत घ्यावी आणि मोठ्या सभांमध्ये ठिकठिकाणी लावावी, अशी उपरोधिक मागणी उदयनराजे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.


