maharashtra

बंडातात्या वारकरी सांप्रदायाला शोभेल, अशी भाषा वापरा

उमेश चव्हाण : दलित महासंघातर्फे बंडातात्यांच्या वक्तव्याचा निषेध

Use language that will suit the Bandatatya Warakari sect
वारकरी सांप्रदायाला मोठी संत परंपरा आहे. या परंपरेने जाती व्यवस्था मोडून काढून खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावली आहे. त्याच वारकरी सांप्रदायात काम करताना प्रबोधनाची भूमिका मांडणाऱ्या हभप बंडातात्या कराडकर यांनी वार्इन विक्रीला विरोध करताना ज्या पध्दतीने महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत ती अंत्यत चुकीची आहे.

सातारा : वारकरी सांप्रदायाला मोठी संत परंपरा आहे. या परंपरेने जाती व्यवस्था मोडून काढून खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावली आहे. त्याच वारकरी सांप्रदायात काम करताना प्रबोधनाची भूमिका मांडणाऱ्या हभप बंडातात्या कराडकर यांनी वार्इन विक्रीला विरोध करताना ज्या पध्दतीने महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत ती अंत्यत चुकीची आहे. त्याचा आम्ही निषेध करतो असे सांगत बंडातात्यांनी वारकरी सांप्रदायाला शोभेल अशीच भाषा वापरावी, असे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कृती समितीचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी म्हटले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात चव्हाण यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्याला क्रांतीकारकांची व इतिहासाची परंपरा आहे. या जिल्ह्याला बंड करण्याचा इतिहास आहे. त्याच जिल्ह्यातील बंडातात्या कराडकर यांचे व्यसनमुक्तीसाठी चांगले कार्य सुरु आहे. त्यांनी संविधानिक मार्गाने राज्य शासनाच्या सुपर मार्केटमध्ये वार्इन विक्री करण्याच्या निर्णयाला केलेला विरोधही लोकांना भावला होता.
मात्र, साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दंडवत-दंडुका आंदोलनावेळी गर्दी पाहून भाषणे करणाऱ्या सर्वच वारकरी महाराजांची भाषा आक्रमक झाली होती. त्यांचा वार्इन विक्रीला विरोध रास्त असला तरी तो करण्यासाठी शांततेच्या व संविधानिक मार्गाने आंदोलन करुन तो व्यक्त व्हायला हवा होता. पण मार्इक हातात आल्यावर बंडातात्यांनी जे भाषण केले त्यावेळी देखील त्यांनी राजकर्त्यांवर येथेच्छ टीका केली. भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
त्यानंतर मिडियाशी संवाद साधताना बंडातात्या आंदोलनावर बोलता बोलता थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर घसरले. त्यासाठी त्यांनी जी असंविधानिक भाषा वापरली ती वारकरी सांप्रदायाची नव्हती. कोणी दारु प्यावी, न प्यावी, नेत्याच्या मुलांनी काय करावे असे सल्ले देताना ज्या प्रकारे बंडातात्यांनी मुक्ताफळे उधळली त्याचा संपूर्ण महाराष्ात निषेध होत असून परिवर्तनवादी कार्यकर्ते म्हणून आम्ही देखील दलित महासंघातर्फे बंडातात्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.
बंडातात्यांच्या वार्इन विक्री आंदोलनाला समाजातून चांगला पाठिंबा मिळत होता. मात्र, ज्या पध्दतीने त्यांनी महिलांविषयी जाहीरपणे अनुद्गार काढले ही बाब त्यांच्या कीर्तनकाराला न शोभणारी आहे. संतश्रेष्ठांनी महिलेला दुर्गेचे रुप मानले आहे पण बंडातात्यांनी थेट नाव घेवून ज्या प्रकारे वक्तव्य केले ते दुसऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेणारे व बदनामी करणारे होते, असेही चव्हाण यांनी पत्रकात म्हटले आहे.