maharashtra

आरोग्य विभागाच्या घंटागाडी टेंडरची अजूनही प्रतीक्षा

प्रशासकीय मान्यतेचा घोळ मिटणार केव्हा?

Still waiting for health department bellcar tender
सातारा शहराची हद्दवाढ होऊन सुमारे दोन वर्षे उलटली तरी अद्यापही सातारा शहराच्या नवीन प्रभागात घंटागाडी सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याचे मूळ कारण आरोग्य विभागाचे घंटागाडीचे टेंडर प्रशासकीय घोळा मध्ये अडकून पडले आहे. फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर असूनही अद्याप त्यावर सही झालेली नाही.

सातारा : सातारा शहराची हद्दवाढ होऊन सुमारे दोन वर्षे उलटली तरी अद्यापही सातारा शहराच्या नवीन प्रभागात घंटागाडी सेवा अद्यापही पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. याचे मूळ कारण आरोग्य विभागाचे घंटागाडीचे टेंडर प्रशासकीय घोळा मध्ये अडकून पडले आहे. फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर असूनही अद्याप त्यावर सही झालेली नाही.
आरोग्य विभागामध्ये सर्वात मलईदार निविदा म्हणून घंटागाडीच्या टेंडर कडे पाहिले जाते. याशिवाय कंत्राटी तत्वावरचे कामगार आणि त्यांना येणारे वेतन नेहमीच वादाचा विषय ठरले आहे. 2020-21 सालाचे घंटागाडीचे टेंडर संपून तब्बल एकवीस महिने उलटत आले तरी अद्यापही घंटागाडीच्या नव्या टेंडरला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तांत्रिक मान्यतेसाठी याच टेंडरची फाईल सुमारे सहा महिने टेबलावर पडून होती. आता त्या घोळातून ही फाईल बाहेर पडल्यानंतर पुढील प्रशासकीय मान्यतेसाठी ती फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलावर दाखल झाली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप सही झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. नगरपरिषद संकलन विभाग व सातारा पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासन दोन्ही पदांवर अभिजित बापट सक्रिय आहेत. या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्यापही सही झाले नसल्याचे सांगितले. मात्र येत्या काही दिवसात जिल्हाधिकाऱ्यांची सही घेऊन ही निविदा तात्काळ अंतिम करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या निविदेच्याच्या घोळामध्ये विलासपूर, गोडोली, शाहूनगर, चार भिंती परिसर येथे अद्यापही पूर्ण क्षमतेने घंटागाडी सुरू होऊ शकलेली नाही. तसेच केवळ निविदा आणि त्याचे वार्षिक दर निश्चित नसल्यामुळे ज्यांच्याकडून करार तत्वावर घंटागाडी ची सुविधा घेतली जात आहे. त्यांना गेल्या तीन महिन्यापासून पगार मिळाला नसल्याची तक्रार आहे. यामध्ये लेखा विभागाकडून चालढकल होत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र लेखा विभागाच्या सूत्रांनी या प्रकरणाचा इन्कार केला आहे. त्यामुळे तात्काळ घंटागाडीचे टेंडर अंतिम करून नवीन भागासाठी ज्या अठरा-एकोणीस गाड्यांची गरज आहे, त्याची तात्काळ खरेदी व्हावी आणि त्या सातारकरांच्या सेवेत रुजू व्हाव्यात, अशी मागणी सजग सातारकर मंचचे अध्यक्ष संतोष शेंडे यांनी केली आहे.