पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम
रविवारी सातारा जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आली जरंडेश्वर डोंगराची स्वच्छता
दि. 29 रोजी ‘आपले किल्ले, आपली जबाबदारी’ अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत जरंडेश्वर या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
सातारा : दि. 29 रोजी ‘आपले किल्ले, आपली जबाबदारी’ अनुषंगाने सातारा पोलीस दलामार्फत जरंडेश्वर या ठिकाणी गड भ्रमंती व स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेमध्ये कोरेगाव उपविभागातील वाठार, रहिमतपूर, कोरेगाव, पुसेगाव या पोलीस ठाण्यांकडील व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कोरेगावकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. तसेच सातारा पोलीस दलातर्फे सदर मोहिमेबाबतची लिंक प्रसारित करण्यात आल्यामुळे सातारा जिल्हयातील नागरीक देखील मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते.
या मोहिमेदरम्यान जरंडेश्वर पायथा जांब बु.ता.कोरेगाव येथे एकत्रीत येवून चढाई (ट्रेक) करण्यात आली तसेच समुह तयार करुन जरंडेश्वर मंदिर परिसर व पायथा येथे नियोजनबध्द स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेला जैविक व अजैविक अंदाजे 144 किलो कचरा गाड्यांमधून कचरा डेपोत पाठवण्यात आला. त्यानंतर जरंडेश्वर मंदीर सभा मंडपात शिव व्याख्याता सुजित श्रीमंत काळंगे यांनी किल्ले संवर्धनाबाबत व सामाजिक विषयाबाबत व्याख्यान दिले.
या मोहिमेमध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, कोरेगाव पोलीस ठाण्याच्या सपोनि श्रीमती अर्चना शिंदे, वाठार पोलीस ठाण्याचे सपोनि संजय बोंबले, रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश कड, पुसेगाव पोलीस ठाण्याचे पो.उ.नि. बाळासाहेब लोंडे असे 13 पोलीस अधिकारी, 85 पोलीस अंमलदार व 78 नागरीकांनी सहभाग घेतलेला होता. तसेच सातारा पोलीस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्ह्यातील एक किल्ला निवडून ही मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे नवीन पिढीमध्ये इतिहासाबद्दल जनजागृती होण्यास देखील मदत होणार आहे.