maharashtra

विलासपूर व गोळीबार मैदान भागाच्या विकासासाठी खा. उदयनराजेंच्या माध्यमातून १२ कोटींचा निधी

उद्योजक संग्राम बर्गे यांची माहिती

for the development of Vilaspur and Golibar Maidan area 12 crore fund through Udayanraje
सातारा शहरासह विस्‍तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्‍यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाने ४८ कोटी रुपये मंजूर केले. पैकी २५ कोटींचा निधी पालिकेकडे आला असून मे अखेर आणि २३ कोटी रुपये जमा होतील. शहराच्या पूर्वेला असणाऱ्या विलासपूर भागाच्या पायाभूत सुविधांसाठी बारा कोटी रूपये दिले जाणार आहेत, अशी माहिती येथील युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी दिली.

सातारा : सातारा शहरासह विस्‍तारित भागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्‍यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून शासनाने ४८ कोटी रुपये मंजूर केले. पैकी २५ कोटींचा निधी पालिकेकडे आला असून मे अखेर आणि २३ कोटी रुपये जमा होतील. शहराच्या पूर्वेला असणाऱ्या विलासपूर भागाच्या पायाभूत सुविधांसाठी बारा कोटी रूपये दिले जाणार आहेत, अशी माहिती येथील युवा उद्योजक संग्राम बर्गे यांनी दिली.
सातारा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची मुदत डिसेंबरमध्‍ये संपल्‍यानंतर पालिकेचे प्रशासक म्हणून मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे कार्यभार गेला. पदाधिकाऱ्यांची मुदत संपण्‍यापूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्‍या पदाधिकाऱ्यांना शहरासह हद्दवाढीनंतर पालिकेत समाविष्ट झालेल्या शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर, पिरवाडी तसेच इतर त्रिशंकू भागातील नागरिकांना आवश्‍‍यक सोयी-सुविधा पुरविण्‍यासाठीचा विकास आराखडा तयार करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या होत्या. खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याशी संपर्क साधत निधीबाबत चर्चा केली. चर्चेअंती अजित पवार यांनी सातारा पालिकेच्या आराखड्यानुसार निधी देण्‍याच्‍या सूचना संबंधित विभागास दिल्‍या.
शासनाकडे सादर केलेल्‍या ५१ कोटींच्‍या आराखड्यानुसार ४८ कोटी देण्‍याचा निर्णय शासनपातळीवर झाला. त्यापैकी २५ कोटींचा पहिला टप्पा पालिकेकडे जमा झाला. उर्वरित २३ कोटी मे महिन्‍याच्‍या अखेरीस जमा होणार आहेत. उपलब्‍ध निधीतून सर्वच भागातील विकासकामे मार्गी लागावीत, यासाठी उदयनराजेंनी उपलब्‍ध आणि येणाऱ्या निधीची शहराच्‍या चारही दिशांत विभागणी करण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत. त्यानुसार विलासपूर, गोळीबार मैदान परिसरासाठी १२ कोटींचा निधी टप्‍प्‍याटप्‍पाने वितरित केला जाणार आहे. यामध्ये रुंद रस्ते, पक्की गटारे, बालोद्यान, मोकळ्या जागांचा विकास, पथदिवे, जॉगिंग ट्रॅक नाना नानी पार्क, वाहतूक सुविधा इं कामे या निधीतून होणार आहे. त्यामुळे आगामी काळात विकासपूर व गोळीबार मैदान परिसरात विकासकामांचा झंझावात नागरिकांना पहावयास मिळेल, अशी ग्वाही बर्गे यांनी दिली.