रेशनिंग दुकानदार केरोसिन परवाना धारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
७ ते ९ फेब्रुवारी पॉज मशिन बंद आंदोलनाचा इशारा
सातारा जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने दि 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पॉज मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेच्या वतीने दि 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पॉज मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ऑनलाईन सर्वर चा सततचा बिघाड ही मूळ तक्रार असल्याचे सांगत संघटना अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.
सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटना, सातारा यांच्या वतीने दुकानदारांना येणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अमर रसाळ, निवासी नायब तहसीलदार दयानंद कोळेकर यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
हे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांचे नेतृत्वाखाली देण्यात आले. याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. अजित कासुर्डे- महाबळेश्वर, राजेंद्र भिलारे- जावली, तुकाराम भादुले- खटाव, राजेंद्र भोईटे- कोरेगाव, मधुकर पवार- खंडाळा, आप्पासाहेब तोडकरी- खंडाळा, सातारा तालुका उपाध्यक्ष- बबनराव देवरे, उपाध्यक्ष- संजय रजपूत, सातारा तालुक्यातील इतर पदाधिकारी, रेशन दुकानदार बंधु - भगिनी उपस्थित होते.
ऑनलाईन सर्वरमध्ये बिघाड, दुकानदारांच्या तक्रारीची एनआयसीने न घेतलेली दखल, त्यामुळे दुकानदार व खातेदार यांच्यात होणारे वादाचे प्रसंग, अन्न सुरक्षा योजनेचे एक वर्षाचे प्रलंबित कमिशन, दुकानदारांच्या दैनंदिन खर्चाची अडचण इं तक्रारींकडे श्रीकांत शेटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. या मागण्यांचा गांभीर्याने विचार न झाल्यास ७ ते ९ फेब्रुवारी पॉझ मशिन बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


