अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कराड शहर पोलिसांची धडक कारवाई
एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त; दोघेजण अटकेत
कराड शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातील एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
सातारा : कराड शहर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूकी विरोधात कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. या दोघांच्या ताब्यातील एस्टीम कारसह 3 लाख 59 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.21 रोजी रात्रगस्त पेट्रोलिंग दरम्यान कराड शहरात सक्त नाकाबंदी व पेट्रोलिंग सुरू होती. पोपटभाई पेट्रोलपंप याठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचे सहा. पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल पुजा पाटील, बीट मार्शल 01 चे संग्राम पाटील व दिपक पाडळकर असे नाकांबंदी करत असताना एक सिल्व्हर रंगाची एस्टीम कार क्रमांक एमएच 14 एएम 9092 ही आली. डी.बी.चे संग्राम पाटील यांना या कारवर संशय आल्याने ती कार थांबवून तपासली असता त्यामध्ये प्रतिबंधीत अन्नपदार्थ पानमसाला गुटखा असल्याचे निदर्शनास आले. मोटार कारमधील दोघांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी नमुदचा गुटखा प्रथम कोल्हापूर येथून घेवून आल्याचे सांगितले. पोलीस ठाण्यात आणून सपोनि अमित बाबर व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने विचारपुस केली असता हा माल कर्नाटकातून घेवून आल्याचे निष्पन्न झाले. या कारवाई दरम्यान एकुण 3 लाख 59 हजारांचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. त्यामध्ये 1 लाख 59 हजार रुपयाचा विमल पानमसाला गुटखा व 2 लाख रुपयांची एस्टीम कार अशी जप्त करणेत आली. या कारवाई दरम्यान दोन संशयीत इसमांना अटक करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अमित बाबर हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख अमित बाबर, पोउपनि अशोक भापकर, सफौ राजू पाटील, पोकॉ संग्राम पाटील, पूजा पाटील, दिपक पाडळकर, सफौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे पोलीस नाईक संजय जाधव, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.


