maharashtra

नवे मालखेडमध्ये तीन ठिकाणी घरफोड्या


Burglary at three places in New Malkhed
मालखेड (नवे) ता. कराड तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी २९ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका घरातील ६२ हजार ४०० रुपये किंमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने कर्त्यांनी लंपास केले आहेत.

कराड : मालखेड (नवे) ता. कराड तीन ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी २९ रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये एका घरातील ६२ हजार ४०० रुपये किंमतीचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने कर्त्यांनी लंपास केले आहेत. याबाबत पूनम अजय ओव्हाळ रा. नवे मालखेड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओव्हाळ यांचे नवे मालखेड येथील समाजमंदीराजवळ घर आहे. शुक्रवारी २९ रोजी रात्री ११ वाजता त्यांचे पती रात्रपाळीच्या नोकरीसाठी पेट्रोल पंपावर गेले होते. ओव्हाळ व त्यांची आजे सासू गंगूबाई, मुलगा उत्कर्ष असे घराच्या सोप्यामध्ये, तर सासू रंजना या किचनमध्ये झोपल्या होत्या. रात्री ३ वाजण्याच्या सुमारास दरवाजाचा आवाज आल्याने पूनम ओव्हाळ यांना जाग आली. त्यावेळी दरवाजाजवळ त्यांना दोन चोरटे दिसल्याने त्यांनी सासूला आवाज दिला. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर ओव्हाळ यांनी खात्री केली असता घरातील पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे २ तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याचे डोरले, १ ग्रॅमचे बदाम व दोन लहान अंगठ्या मिळून ६२ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, शेजारच्या शहाबाई ओव्हाळ यांच्या बंद घराचे कुलूप तोडून त्यांच्याही घरात चोरट्यांनी हातसाफ केले. त्याशिवाय अरुण ओव्हाळ यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याबाबत पूनम ओव्हाळ यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात दोन चोरट्याविरुध्द कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव करत आहेत.