सेव्हन स्टार इमारतीमधील गाळेधारकांचे व्यवहार बंद ठेवून आंदोलन
गाळेधारकांना पार्किंगची सोय मिळत नसल्याची तक्रार; विकसक आणि एसटी महामंडळ यांच्यामध्ये टोलवाटोलवी
सेव्हन स्टार इमारतीमधील गाळेधारकांनी आपले व्यवहार बंद ठेवून पार्किंग सुविधा मिळत नसल्याच्या कारणाचा निषेध केला. पे अँड पार्किंग परिसरात विक्रेत्यांनी बैठक घालून निषेधाच्या घोषणा दिल्या. इमारतीचे विकसक महेंद्र चव्हाण आणि एसटी महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी होत असून त्यामध्ये आर्थिक फटका गाळेधारकांना बसला आहे, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.
सातारा : सेव्हन स्टार इमारतीमधील गाळेधारकांनी आपले व्यवहार बंद ठेवून पार्किंग सुविधा मिळत नसल्याच्या कारणाचा निषेध केला. पे अँड पार्किंग परिसरात विक्रेत्यांनी बैठक घालून निषेधाच्या घोषणा दिल्या. इमारतीचे विकसक महेंद्र चव्हाण आणि एसटी महामंडळ यांच्यात टोलवाटोलवी होत असून त्यामध्ये आर्थिक फटका गाळेधारकांना बसला आहे, अशी तक्रार त्यांनी यावेळी केली.
सातारा एसटी स्टँड परिसरातील सुमारे अडीच एकर जागा दहा वर्षांपूर्वी विकसित करण्यात आली होती. याचे विकसक साताऱ्यातील सुप्रसिद्ध ठेकेदार महेंद्र चव्हाण हे आहेत. या सेवन स्टार इमारतीमध्ये तब्बल 42 गाळे आहेत. मंगळवारी येथील गाळेधारकांनी अचानक व्यवहार बंद ठेवून निषेधाचे फलक हातात घेऊन पार्किंग सुविधा मिळत नसल्याच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. गाळेधारकांच्या तक्रारीनुसार एसटी महामंडळ आणि विकसक यांच्यामध्ये करार होऊन आणि इमारतीच्या तिन्ही बाजूला पार्किंग उपलब्ध असतानासुद्धा आम्हाला पार्किंग उपलब्ध होत नाही. इमारतीच्या दक्षिणेला असणारे पार्किंग एसटी महामंडळाच्या ताब्यात असून तेथे त्यांना गाड्या लावू दिल्या जात नाहीत. इमारतीसमोर असणारे जे पार्किंग आहे ते पार्किंग लोकांकडून वापरले जात असल्याने ती सकाळीच हाउसफुल होते. त्यामुळे सेव्हन स्टार इमारतीत खरेदीसाठी येणारा ग्राहक केवळ पार्किंगला जागा नसल्यामुळे तेथे थांबत नाही. त्याचा आर्थिक फटका आम्हाला बसतो, अशी गाळेधारकांची तक्रार आहे.
नगरपालिकेने बांधकाम परवाना देताना पार्किंग कशा पद्धतीने ठरवून दिले हे आम्हाला समजायला मार्ग नाही. त्यामुळे गाळेधारकांना तात्काळ या प्रश्नासंदर्भात न्याय मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. गाळेधारकांनी इमारतीच्या बेसमेंट मध्ये बैठक मारून हा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांच्या हातामध्ये निषेधाचे फलक पहावयास मिळाले. मुळात एसटी महामंडळ आणि विकसक महेंद्र चव्हाण यांच्यामध्ये काय करार झाला, याची ठोसपणे माहिती समोर आलेली नाही. प्राप्त माहितीनुसार एसटी महामंडळाने या संदर्भात पार्किंगची एक बाजू देणे अपेक्षित आहे. मात्र पार्किंगच्या सुविधेवर दोन्ही बाजूनी हात झटकले गेल्यामुळे तेथील गाळेधारकांची मात्र प्रचंड अडचण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नांमध्ये लक्ष घालून आमचा तात्काळ पार्किंगचा प्रश्न सोडवावा, अशी गाळेधारकांची मागणी आहे.


