फरासवाडीतील खून प्रकरणी एकास अटक
12 तासांत खुनाचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका पोलिसांची कारवाई
एकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना मंगळवारी रात्री फरासवाडी ता. सातारा येथे उशिरा उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि तालुका पोलिसांनी 12 तासांच्या आत या खुनाची उकल केली आहे.
सातारा : एकाचा धारदार शस्त्राने खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आला होता. ही घटना मंगळवारी रात्री फरासवाडी ता. सातारा येथे उशिरा उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा कौशल्याने तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि तालुका पोलिसांनी 12 तासांच्या आत या खुनाची उकल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल दि. 3 रोजी फिरोझ चांद मुलाणी (वय 37, सध्या रा. फरासवाडी-कोंडवे, ता. सातारा, मूळ रा. कडेगांव, जि. सांगली) यांचा धारदार शस्त्राने वार करुन खून झाला होता. फिरोझ हे सासरवाडीमध्ये कुटुंबासोबत राहत आहेत. काल रात्री त्यांच्या भावाला फिरोझ यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सातारा तालुका पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रूग्णालयामध्ये नेण्यात आला. फिरोझ यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ तसेच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या अधिपत्याखाली पथक तयार करण्यात आले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचार्यांनी तपास केला असता एका संशयिताचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव शकील निजाम फरास, (वय 42, रा. नेले, ता. सातारा) असे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने फिरोझ चांद मुलाणी याच्या पत्नीशी माझे अनेतिक संबंध होते. त्यामध्ये फिरोज आडकाठी आणत असल्यामुळे त्याचा आपण खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी केली आहे.


