maharashtra

नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक


मंत्रालयात नोकरीस लावतो, असे सांगून सांगली जिल्ह्यातील एकाने भाडळे, तालुका कोरेगाव येथील चालक रामदास बाळू आवारे याची चार लाख 99 हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

सातारा : मंत्रालयात नोकरीस लावतो, असे सांगून सांगली जिल्ह्यातील एकाने भाडळे, तालुका कोरेगाव येथील चालक रामदास बाळू आवारे याची चार लाख 99 हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रकाश उर्फ सुनील आनंदा बनसोडे राहणार ऐतवडे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली यांच्यावर पुसेगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख काही कामानिमित्ताने झाली होती. त्यावेळी बनसोडे यांनी रामदास आवारे याला मंत्रालयात नोकरी लावतो, असे सांगून त्याच्याकडून दिनांक ६ ऑक्टोबर 2020 रोजी 49 हजार रुपये, दिनांक सात ऑक्टोबर 2020 रोजी दीड लाख रुपये ,दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी तीन लाख रुपये असे एकूण चार लाख 99 हजार रुपये घेतले. ही रक्कम वक्रतुंड मोटर्स आयडीबीआय बँक कोरेगाव येथे भरावयास सांगण्यात आली होती.
एवढे पैसे भरूनही मंत्रालयात नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याचे आवारे यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार सि. आर. खाडे अधिक तपास करत आहेत.