maharashtra

जिहे-कठापूर योजनेसाठी 247 कोटी

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

247 crore for Jihe-Kathapur scheme
जिहे-कठापूर योजनेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 247 कोटी मंजूर केल्याने या योजनेच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेवून जिहे-कठापूरचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने 247 कोटींचा निधी जिहे-कठापूर योजनेसाठी मंजूर केला आहे.

सातारा : माण-खटाव तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या जिहे-कठापूर योजनेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 247 कोटी मंजूर केल्याने या योजनेच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेवून जिहे-कठापूरचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने 247 कोटींचा निधी जिहे-कठापूर योजनेसाठी मंजूर केला आहे.
माण तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची असलेली दुष्काळी पट्ट्यातील जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरु कै.लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावाने असलेली जिहे कटापूर योजना रखडली होती. माण तालुक्यातील जनतेला उरमोडी व जिहे-कठापूर चे पाणी मिळावे यासाठी अनेक नेत्यांनी संघर्ष केला. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी स्वतःच्या सरकारच्या विरोधामध्ये या दुष्काळी भागाला पाणी मिळावे म्हणून पदयात्रा काढून हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर गेली पंधरा वर्षे या दुष्काळी पट्ट्यातील आमदार जयकुमार गोरे यांनी सातत्याने सभागृहामध्ये व सभागृहाबाहेर संघर्ष उभा करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले व दुष्काळी भागासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना निधी उपलब्ध झाला व प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. परंतु महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या योजनेस निधी उपलब्ध करून दिला नाही.
या कारणास्तव खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर केंद्रीय जलसंपदा कमिटीवर सदस्य असल्यामुळे आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ही योजना दुष्काळी भागाला कशी फायदेशीर आहे व राज्य शासन दुष्काळी भागाला पैसे देऊ शकत नाही तरी पंतप्रधान सिंचन योजनेतून आपण निधी उपलब्ध करून द्यावा, अशी वारंवार मागणी केली. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन जलसंपदा विभागाला आदेश दिले. जलसंपदा विभागाचे मंत्री यांनी याबाबत पाठपुरावा करून आज जिहे-कठापूर योजनेस 247 कोटी रुपये मंजूर केले व त्यापैकी सहा कोटी रुपये 31 मार्च 2022 ला कामावर तरतूद केली. यामुळे माण-खटाव तालुक्यातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी जिहे कटापूर चे पाणी माण तालुक्यात आणले नाही तर आमदारकीची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. परंतु दुष्काळी भागातील नेतृत्वाने केलेला संघर्ष, सातत्याने केलेला पाठपुरावा याला आज यश आले आहे. आता माण तालुक्यातील शेतकर्‍यांना भविष्यामध्ये दुष्काळाची अवहेलना सहन करावी लागणार नाही. या भागातील युवक आता रोजगारासाठी पुणे-मुंबई या भागात जाणार नाही. पाणी उपलब्ध झाल्यास रोजगाराच्या संधी माण तालुक्यामध्ये उपलब्ध होतील. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध झाला आहे. हिंदू संस्कृतीतील पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुष्काळी भागाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही भेट उपलब्ध करून दिली आहे.
माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी खासदार झाल्यापासून मतदारसंघातील रस्ते, रेल्वे, पाणी योजना मंजूर करून घेण्याचा सपाटा लावलेला आहे. त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. प्रचाराच्या दरम्यान रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पुढील निवडणूक ही पाणीप्रश्नावर होणार नाही, अशी घोषणा केली होती. ती आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, जलसंपदामंत्री गजेंद्र सिंह शेखावत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व केंद्रीय स्तरावरील सर्व सचिव यांचे दुष्काळी भागातील जनतेच्या वतीने आभार मानले.