maharashtra

साताऱ्यात महा विकास आघाडीचे पॅनेल दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली

सातारा पालिकेसाठी राष्ट्रवादीची राजकीय जुळवाजुळव सुरू

पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नगरपालिकेला पॅनल उभे करणार, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आज पुणे येथील बारामती हॉस्टेल येथे दीपक पवार यांच्यासोबत बैठक पार पडली.

सातारा : समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन सातारा शहराचा खुंटलेला विकास जर संपवायचा असेल तर दीपक पवार एकमेव नेतृत्व आहे. ते या शहरामध्ये सामान्य जनतेला न्याय देतील आणि शहराचा विकास करतील, असा माझा विश्वास आहे. म्हणून पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नगरपालिकेला पॅनल उभे करणार, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आज पुणे येथील बारामती हॉस्टेल येथे दीपक पवार यांच्यासोबत बैठक पार पडली.
शहरामध्ये सामान्य जनतेचे होत असलेली मुस्कटदाबी विकासाच्या फसव्या घोषणा यामुळे जनता त्रस्त आहे. शहरातील अनेक लोक व विविध पक्षांचे तसेच संघटनांचे प्रमुख दीपक पवारांना भेटत आहेत. नगरपालिकेच्या अनेक वॉर्डमधील इच्छुक उमेदवार देखील भेट घेत आहेत. परंतु सातारा शहरात मेळावा घेऊन याबाबतचे चित्र स्पष्ट करणार आहे. सध्या देशामध्ये नफरत तोडो, भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्याच प्रकारे सातारा शहरामध्ये पॅनल उभे करावे लागणार आहे, असे पवार यांनी सांगितले.
बैठकीनंतर दीपक पवार यांनी सांगितले की, सातारा नगरपालिकेमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व सामान्य कुटुंबातील जनतेची नाळ असलेले उमेदवार उभे करणार आहे. लवकरच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत बैठक घेणार असून सातारा शहरामध्ये भव्य मेळावा होणार असल्याचे ते म्हणाले.