छत्रपती शिवरायांना राजधानी शाहूनगरीचा मानाचा मुजरा
महाआरती, शाही मिरवणूक, पोवाडे यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय
राजधानी शाहूनगरीने रविवारी शिवजयंती निमित्त साक्षात शिवकाळ अनुभवला. पोवाडे, तुताऱ्यांचा निनाद, शाही मिरवणूक, महाआरती अशा विविध कार्यक्रमातून सातारा शहरासह जिल्ह्यात शिवजयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.
सातारा : राजधानी शाहूनगरीने रविवारी शिवजयंती निमित्त साक्षात शिवकाळ अनुभवला. पोवाडे, तुताऱ्यांचा निनाद, शाही मिरवणूक, महाआरती अशा विविध कार्यक्रमातून सातारा शहरासह जिल्ह्यात शिवजयंती पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली. चौका-चौकात उभारलेल्या भगव्या स्वागत कमानी, भगव्या पताका, भगवे फेटे घातलेले मावळे भगवे झेंडे घेऊन शिवज्योती बरोबर राहणारे शिवभक्त अशा जल्लोषपूर्ण वातावरणामुळे शाहूनगरी अक्षरश: शिवमय झाली होती.
तत्पूर्वी सकाळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पोवई नाका येथे शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांची कन्या श्रीमंत वृषालीराजे भोसले (पवार), त्यांचे चिरंजीव श्रीमंत कौस्तुभ आदित्य पवार यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यादोगोपाळ पेठ येथे अजिंक्यतारा मित्र समूहाच्यावतीने रक्तदान यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव अशा जय घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला. शिवतीर्थावर आसमंत उजळून टाकणाऱ्या विद्युत रोशनाईच्या साक्षीने राजमाता कल्पनाराजे भोसले व स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात शाहीर विनता जोशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शिवेंद्रजी मित्र समूहाच्या वतीने देखील राजधानी महोत्सव उपक्रमांतर्गत महाआरतीचा आयोजन करण्यात आले होते. दोन्ही आरत्या आणि शाही मिरवणुका यामुळे शिवतीर्थावर अलोट गर्दीचा महासागर उसळला होता.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी रविवारी संपूर्ण ऐतिहासिक सातारा शहर राजधानी ही शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले .मागील दोन वर्षे करोना महामारीमुळे यात्रा, जत्रा, मिरवणुका तसेच जयंत्या आणि उत्सव साजऱ्या करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची अट, नियम आणि बंदी असल्यामुळे थोडीशी मरगळ आली होती. मात्र यावर्षीचा हा शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात विविध उपक्रम तसेच कार्यक्रमातून सातारा जिल्ह्यात सादर करण्यात आला.
राजधानी सातारा, किल्ले प्रतापगडासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाचा गजर ऐकावयास मिळत होता. कोरोनाच्या निर्बंधाच्या कटू स्मृती मागे ठेवून शिव मावळ्यांनी आजची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. रात्री बारा वाजल्यापासूनच शिवज्योती साताऱ्यात दाखल व्हायला सुरुवात झाली होती. राजवाडा तसेच पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर आकर्षक विद्युत रोशनाईने न्हाऊन निघाला. किल्ले अजिंक्यतारा येथून पोवई नाका येथे शिवजोत आणण्यात आली. शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दिवसभर शिवभक्तांची रांग लागली होती. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने राजवाडा ते पोवई नाका यादरम्यान शाही मिरवणूक काढण्यात आली होती. हत्ती, घोडे, मावळे, शिंग तुताऱ्या अशा शाही वातावरणामुळे साक्षात शिवकाळाचा अनुभव राजधानी शाहू नगरीने घेतला या शाही मिरवणुकीमध्ये हजारो मावळे सहभागी झाले होते स्वतः आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुद्धा या मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख हे सुद्धा उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त सातारा शहरातून सायंकाळी ऐतिहासिक भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शिवचरित्रावरील चित्ररथ, देखावे तसेच घोडे, उंट आणि ऐतिहासिक पोशाख परिधान केलेले युवक -युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येथील प्रतापगडावर सुद्धा सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरासह जिल्ह्यात विविध सार्वजनिक मंडळांनी राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, वैराटगड, रायरेश्वर, सिंहगड, अजिंक्यतारा, पन्हाळगड, विशाळगड, मुरुड जंजिरा, सज्जनगड, पुरंदर यासह शिवस्पर्शाने पावन झालेल्या विविध किल्ल्यावरून शिवज्योत दौडीचे आयोजन केले होते. पोवई नाक्यावर पीपल्स हॅपी ग्रुपच्यावतीने शिवभक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील प्रमुख सार्वजनिक चौकांत शिवप्रतिष्ठापना, देखणी सजावट व ऐतिहासिक देखाव्यांची रेलचेल जाणवली. तालीम संघ मैदान येथील शिवगंध प्रतिष्ठानने छत्रपती शिवरायांची भव्य मूर्ती स्थापन केली होती. गोल मारुती चौकात तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीपुढे शिवरायांची अर्ध प्रतिमा पूजेसाठी मांडण्यात आली होती. राजपथावरील देवी चौकात फुलांची केलेली आरास विशेष लक्षवेधक ठरत होती, तर शुक्रवार पेठेत क्रांतीस्मृती विद्यालय चौकात रायरेश्वर मंदिराचा भव्य सजावट देखावा उभारण्यात आला होता. शुक्रवार पेठेतील तुळजामाता मंदिर परिसरात शहाजीराजे भोसले प्रवेशद्वाराची भव्य प्रतिकृती व देखावा सादर करण्यात आला होता. राजवाडा येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा भव्य मेघडंबरीवर स्थापन करण्यात आला होता. शिवपराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडे, व्याख्याने यासह विविध सामाजिक उपक्रम थाटात राबवण्यात आले. राजवाडा गांधी मैदान सातारा येथून व फुटका तलाव सातारा येथून महिलांची बाईक रॅली आणि दोन्ही बाईक रॅली शिवतीर्थावर पोहचल्यानंतर सायंकाळी सात वाजता शिवतीर्थावर होणारी महाशिवआरती श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या शुभहस्ते व महिला रणरागिनी यांच्या हस्ते करण्यात आली. दिवसभर आपल्या दुचाकी गाड्यांना भव्य भगवे ध्वज बांधून ते फडकावत ऐतिहासिक पोशाखात तसेच युवती नऊवारी साड्या नेसून या दुचाकीवरून रपेट मारताना दिसत होत्या.
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा शहरासह जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


